कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याकडून सभासद शेतकऱ्याला कोणतीही कल्पना न देता शिवारातील ऊस रात्री तोडून तो पहाटे कारखान्याकडे घेऊन जाण्याचा प्रकार घडला. यावर कसबा बावडा येथील शेतकरी पंडित नेजदार यांनी आक्षेप घेतला असून याचा निषेध त्यांनी केला. याशिवाय याचा जाब देखील त्यांनी संबंधितांना विचारला. विरोधी शेतकऱ्यांच्या उसाला तोड द्यायची होती तर इतके दिवस गप्प का होता. रात्री अचानक तोड देऊन पहाटे कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यामागे कारखान्याचा कोणता हेतू आहे, असा सवालही आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.राजाराम कारखान्याकडून, ऊस वेळेत नेला जात नसल्याने मंगळवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. याशिवाय संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण केल्याची घटना त्याच दिवशी घडली. या प्रकारानंतर कारखाना प्रशासनाने आपण विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस देखील नेला आहे. हे दाखवण्यासाठी मंगळवारी रात्री पंडित नेजदार यांच्या उसाला तोड देत बुधवारी पहाटे हा ऊस ट्रॅक्टरद्वारे राजाराम कारखान्याला नेला.हा प्रकार समजल्यानंतर पंडित नेजदार यांनी यावर आक्षेप घेतला. विरोधी शेतकऱ्यांच्या उसाला तोड द्यायची होती तर इतके दिवस गप्प का होता. रात्री अचानक तोड देऊन पहाटे कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यामागे कारखान्याचा कोणता हेतू आहे, असा सवालही पंडित नेजदार यांनी उपस्थित केला.मारहाण रागातूनच..राजाराम कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांच्या उसाला वेळेत तोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उभा ऊस शिवारातच वाळू लागला होता. कारखाना निवडणुकीच्या काळात ज्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली अशा विरोधी शेतकरी सभासदांचा ऊस कारखान्याकडून जाणीवपूर्वक नेला जात नाही. मात्र, याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मंगळवारी कारखान्याचे कार्यकारी संचालक चिटणीस यांना मारहाणीची घटना घडली.
Kolhapur: एमडींना मारहाण होताच ऊस तोडून नेण्याची घाई; राजाराम कारखान्याची तत्परता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 2:35 PM