योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:51 PM2019-10-26T12:51:55+5:302019-10-26T13:09:49+5:30
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली.
संतोष मिठारी
कोल्हापूर : मतदारसंघातील विविध पातळ्यांवरील योग्य राजकीय जोडण्या, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि जनतेची मिळालेली साथ यांच्या जोरावर आमदार सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांचा ‘दक्षिण’ विजय साधला. महानगरपालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य ते ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि कार्यकर्ते अशा प्रत्येक पातळीवर झालेल्या सांघिक कामाच्या (टीमवर्क) जोरावर ‘आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय’चा नारा यशस्वी ठरला.
विधान परिषद, लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही महाडिक यांना पराभूत करण्याचा निर्धार करत आमदार पाटील यांनी त्यांचे ‘होम पिच’ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पुतणे ऋतुराज पाटील यांना उतरविले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. गावागावांमध्ये राजकीयदृष्ट्या आवश्यक असणारे पॅचवर्क करीत आपल्या गटाची ताकद वाढविली. ऋतुराज यांना विजयी करून महाडिक यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक साधण्याची थेट भूमिका घेत आमदार पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले. वैयक्तिक गाठी-भेटी, प्रचारसभा, पदयात्रांद्वारे आमदार पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. या निवडणुकीत त्यांनी मांडलेली भूमिकेला जनतेची साथ मिळाली.
ऋतुराज यांनी आर. पी. ग्रुप आणि फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या तरुणाईच्या संघटनाची मदत झाली. विरोधकांवर टीका करणे टाळून मतदारसंघाच्या विकासासाठी काय करणार या मुद्द्यावरील ऋतुराज यांनी केलेला प्रचार मतदारांना भावला. ‘मिशन रोजगार’मुळे अधिकतर युवा मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. आमदार पाटील गटाचा प्रत्येक कार्यकर्ता राबला. त्याचे प्रतिबिंब फेरीनिहाय मिळालेल्या मताधिक्यात उमटले आणि ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय झाला.
- शहरासह ग्रामीण भागातही आघाडी
मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण मतदारांनी ऋतुराज यांना भरभरून साथ दिली. गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी आमदार पाटील कमी पडले होते, त्या ठिकाणी यावेळी ऋतुराज यांना चांगले मताधिक्क्य मिळाले. त्याची सुरुवात लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, रिंग रोड, मीराबाग परिसरातील पहिल्या फेरीने झाली. या फेरीतच त्यांना ३८०२ इतके मताधिक्य होते. दुसºया फेरीत ते दुप्पट झाले. त्यानंतर फेरीनिहाय त्यामध्ये वाढच होत गेली. शहरातील महापालिकेचे प्रभाग आणि उपनगरांनी २४,९६५ मतांनी ऋतुराज यांना आघाडी दिली. ग्रामीण भागात मताधिक्य थोडे कमी होईल, असा पाटील गटाचा अंदाज होता; पण, उचगाव, पाचगाव, वळिवडे, खेबवडे, उजळाईवाडी, कंदलगाव, दºयाचे वडगाव अशा सर्वच गावांनी एकूण १७,७४४ इतक्या मताधिक्यासह ऋतुराज यांना एकतर्फी विजयी केले. गांधीनगरमध्ये गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यावर ३२०० मताधिक्य होते. यावेळी त्याची परतफेड करून १९६ मताधिक्य पाटील गटाने मिळविले. एकूणच पाहता मतदारसंघातील शहरास ग्रामीण भागात पुन्हा पाटील गटाने आघाडी मिळविली आहे.
- महाडिक यांना बसला याचा फटका
गेल्या निवडणुकीत आमदार पाटील यांच्यापासून फारकत घेत महाडिक यांच्याबरोबर राहिलेले काही नेते यावेळीही महाडिक यांच्यासमवेत कायम राहिली; पण, त्यांनाही जनतेचा कौल महाडिक यांच्याकडे वळविण्यात यश आले नाही. विकासकामांसाठी ११५० कोटींचा निधी आणून पाणीपुरवठा योजना, एलईडी दिवे बसविणे, आदी कामे आमदार अमल महाडिक यांनी केली. विविध योजना राबविल्या. मात्र, मतदारसंघातील ३७ गावांना महाडिक गटाची ‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करण्याची भूमिका रुचली नाही.
केंद्रात असलेले भाजप सरकार आणि राज्यात केलेल्या विकासकामांमुळे मतदार पुन्हा आपल्याला जनादेश देतील, अशी महाडिक यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. भाजप अथवा महाडिक गट ज्या भागाला आपली व्होट बँक समजत होते, त्या ठिकाणीच त्यांना मोठा फटका बसला. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने एक नाराजी व्यक्त होत होती. त्याचा फटकाही या निवडणुकीत अमल महाडिक यांना बसला आहे.