कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. श्रीरंग बरगे म्हणाले, विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यांत यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत. एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करावी. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.