एस. टी.च्या कोल्हापूर विभागात ४९०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ४५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वसाधारणपणे तीन हजार इतकी आहे. यातील चालक, वाहकांची संख्या २००० इतकी आहे. अत्यावश्यक सेवेखाली या कर्मचाऱ्यांना महामंडळाने नेमणुकीच्या ठिकाणी रोज उपस्थिती लावणे अनिवार्य केले आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी बोलाविल्यामुळे सहाजिकच ते एकत्रित येणार आणि पर्यायाने कोरोना संसर्गाने बाधित होणार आहेत. यापेक्षा ज्या कर्मचाऱ्यांची कामावर गरज आहे, अशा कर्मचाऱ्यांनाच कामावर नेमणुकीच्या ठिकाणी बोलवावे. याबाबतचे नियोजन महामंडळाच्या प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते; पण ते अद्यापही झालेले नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कामगार संघटनांनी प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत.
हे आदी करा
मागच्या लाॅकडाऊन काळात कर्तव्यावर असताना कोरोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही वैद्यकीय बिले मिळालेली नाहीत. कोविडमुळे राज्यात अनेक कर्मचारी मृत्यू पावले. त्यांना अटी-शर्तींमुळे ५० लाखांचे विमा कवचही मिळाले नाही. किमान ४५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून लसीकरणाचा कॅम्प लावावा, अशी मागणी संघटनांकडून होत आहे.
चौकट
दरम्यान, सोमवारी दिवसभरात अत्यावश्यक सेवेखाली पुणे, सातारा, सांगली व जिल्ह्यातील मुरगूड, राधानगरी, गारगोटी, आजरा, चंदगड, शाहूवाडी, मलकापूर, आदी ठिकाणी २० बसेसद्वारे ८० फेऱ्या झाल्या.
प्रतिक्रिया
एस. टी.च्या ४५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. त्याची सोय महामंडळाच्या प्रशासनाने प्राधान्याने करावी. शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य न करता केवळ काम असेल त्या कर्मचाऱ्यालाच नेमणुकीच्या ठिकाणी बोलवावे.
-उत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना