कोल्हापूर : शुक्रवारी रात्री जमावबंदीत बंदोबस्तावरील ते दोघे पोलीस महाद्वार चौकात भाविकांची गर्दी हटवत होते, इतरांप्रमाणे त्यांनी एका आलिशान मोटारीतील महिला व चालकासही हटकले. ‘मॅडम, जमावबंदी आदेशात गाडी कुठं फिरवताय... दंडाची पावती करा, नाही तर तुमच्यावर १८८ प्रमाणे कारवाई करतो, असा दमच दिला. पण नंतर त्या मॅडम म्हणजे स्वत: महानगरपालिका प्रशासन तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व चालक हे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघा पोलिसांचीही भंबेरी उडाली.
बलकवडे दांपत्याने त्या दोघांचे प्रामाणिक कर्तव्याबद्दल कौतुक करून त्यांना रिवाॅर्ड जाहीर केले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय मासरणकर व शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल संजय महेकर यांच्या या प्रामाणिक कर्तव्याची चर्चा पोलीस खात्यात रंगली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत जमावबंदी केली. शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. शुक्रवारी रात्री श्री अंबाबाई देवीची मंदिर आवारातच पालखी झाली. भाविकांनीही महाद्वारातूनच दर्शन घेतले.
तेथे बंदोबस्ताला असलेले जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील संजय मासरणकर व वाहतूक शाखेचे संजय महेकर यांनी परिसरातील गर्दी हटवली. रात्री सव्वादहाला त्यांनी काळ्या रंगाच्या मोटारीलाही पुढे जाण्यास अटकाव केला.
‘मॅडम, कुठे फिरताय, जमावबंदी आहे, पेपरात वाचले की नाही, तुमच्यासारखी सुशिक्षित माणसे अशी वागली, तर इतरांनी काय करायचे’ असा जाब विचारला. मॅडमनी, ‘एक मिनिटात देवीचे दर्शन घेतो,’ अशी विनवणी केली, तरीही त्यांची गाडी पुढे सोडली नाही. उलट, मासरणकर यांनी पुढे होऊन सहकारी वाहतूक शाखेचे महेकर यांना दंडाची पावती करा, दंड देत नसतील तर त्यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा नोंदवा, असा दमच दिला.
त्यानंतर मॅडमनी चेहऱ्यावरील स्कार्प काढला व शेजारी साहेब बसलेत, असे कॉ. मासरणकरला सांगितले. ते दंडाची पावती करताना, चालकाने मोटारीची काच खाली केली, तेथे अधीक्षक शैलेश बलकवडे दिसताच दोघांचीही भंबेरी उडाली. दोघांनीही साहेबांना सॅल्युट केला. साहेब व मॅडम यांनी मोटारीतून उतरुन दोघा प्रामाणिकपणे उत्कृष्ट, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर थाप मारुन काैतुक केले.
साहेब, झाले खूष...
त्या दोघा पोलिसांचे प्रामाणिक कर्तव्य अधीक्षक बलकवडे व आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दूरवर थांबून किमान २५ मिनिटे मोटारीतूनच टिपले होते. दोघा पोलिसांची जणू त्यांनी परीक्षाच घेतली. दोघेही कर्तव्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने साहेब खूष झाले. त्यांनी पुढे जाऊन वायरलेसवरुन नियंत्रण कक्षाला कळवून महाद्वार चौकातील दोघाही पोलिसांना प्रामाणिक कर्तव्याबद्दल रिवॉर्ड जाहीर केल्याचे कळवले.
पोलीस उपअधीक्षकही आले ‘पॉईंटवर’
पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी त्या दोघांना रिवॉर्ड जाहीर केल्याचे वायरलेसवरून समजताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे रात्रीच तातडीने महाद्वार चौकात पॉईंटवर येऊन त्यांनी पोलीस संजय मासरणकर व संजय महेकर यांची भेट घेऊन, मेजर तुम्ही पोलीस खात्याची लाज राखली, अशा शब्दात कौतुक केले.