कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य शासनाच्या अंगिकृत असलेले एस. टी. महामंडळही अर्थिक डबघाईला आले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी नवनवे प्रयोग करणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यानुसार कोल्हापूर विभागातर्फे कोल्हापूर दर्शनसह गणपतीपुळे, मालवण, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशा एक दिवसाच्या ‘पॅकेज टूर’ आयोजित केल्या जाणार आहेत. या सर्व सहली अल्प दरात प्रवाशांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीनंतर तीन महिने लाॅकडाऊन आणि त्यानंतर प्रथम जिल्हांतर्गत, त्यानंतर जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात अशी टप्प्याटप्याने एस. टी.ची वाहतूक सुरु करण्यात आली. या दरम्यान महामंडळाच्या राज्यातील आगारांनी मर्यादीत स्वरूपात मालवाहतुकीचा पर्याय निवडला होता. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील एस. टी.ची चाके फिरली. त्यानंतर अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आणि पुन्हा नियमितपणे पाचशे ते सातशे बसेस धावू लागल्या आहेत. परंतु, प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महामंडळाचा संचित तोटा वाढू लागला आहे. रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्न वाढीबरोबरच पर्यटनही वाढावे, याकरिता कोल्हापूर विभागाने ‘पॅकेज टूर’ची संकल्पना आणली आहे. यामध्ये प्रतिमाणसी अल्पदरात कोल्हापूरसह गणपतीपुळे, मालवण, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशा विविध पर्यटनस्थळांच्या एक दिवसांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या कालावधीत सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
चौकट
- कोल्हापूर - जोतीबा, पन्हाळा, कणेरीमठ, करवीर दर्शन ( प्रतिमाणसी दर - ४०५ रुपये)
- कोल्हापूर - जोतीबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूर ( ४०५ रुपये)
- कोल्हापूर - रत्नागिरी, गणपतीपुळे दर्शन ( ५४० रु)
- कोल्हापूर - मालवण, देवबाग, तारकर्ली (५४० रु)
कोट
पर्यटनवाढीबरोबर एस. टी.चे उत्पन्न वाढीसाठी कोल्हापूर विभागातून अशाप्रकारच्या एक दिवसीय टूरचे आयोजन केले आहे. अल्पदरात प्रवाशांना ही स्थळे पाहता येणार आहेत.
- अजय पाटील, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर