प्रदीप शिंदे - कोल्हापूर q--एस. टी. महामंडळाच्यावतीने ‘हात दाखवा, गाडी थांबवा!’ अशी घोषणाबाजी कधी काळी करण्यात आली होती; पण ‘हात दाखवून अवलक्षण’चाच काहीसा अनुभव तेव्हाही येत होता व आताही येत आहे. त्याचा प्रत्यय कोल्हापूर ते गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगावकडे जाणाऱ्या एस. टी. बसेसमधून दररोज प्रवाशांना येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र परिवहन महामंडळास प्रवाशांचे वावडे आहे का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. एस. टी. नफ्यात आणण्यासाठी महामंडळाने विविध योजना सुरू केल्या आहेत़ मात्र, एस. टी.चे काही कर्मचारी त्यालाच पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड आगारातून कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेसकडे पाहिल्यानंतर दिसून येते. चालकांच्या या मनमानी कारभारामुळेच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच पण चालकांच्या या बेशिस्त वर्तनाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने तोट्यातील एस.टी. अधिकच खड्ड्यात रूतत आहे. या मार्गावरील अनेक गाड्या प्रशासनाने दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. विशेषकरून टेंबलाईवाडी, शिवाजी विद्यापीठ, आर.सी.सी. बिल्डर स्टॉप, उजळाईवाडी येथील उड्डाणपूल परिसरात अनेक प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा एस. टी. बसेस न थांबता रिकामी घेऊन जाण्याचा चालक व वाहकांना धन्यता वाटते. त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण- तरुणींसह वयोवृद्धांना बसत आहे. शासनाने दिलेल्या एस. टी. सवलतीचा लाभ घेत हे ज्येष्ठ नागरिक एस. टी.नेच प्रवास करत असतात़ मात्र, त्यांनाही गाडी थांबविण्यासाठी विनंती करूनसुद्धा चालक एस. टी. थांबवत नसल्याचा अनुभव येत आहेत. विनाथांब्याचे गणित काय?कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कंट्रोल रूमच्या माहितीनुसार, गडहिंग्लज आगारातून कोल्हापुरात दररोज ४० फेऱ्या होतात. त्यातील कोल्हापूर ८ फेऱ्यांची विना थांबा गाड्यांची नोंद आहे. मात्र, या मार्गावर सर्व गाड्या विनाथांबा असल्यासारखे धावतात. त्यांच्या या मनमानी कारभाराचा फटका मात्र एस.टी.च्या उत्पन्नावर व प्रवाशांना बसत आहे. आर.सी.सी. बिल्डर स्टॉपची ‘अॅलर्जी’हनुमानगर परिसर, ग्रीन पार्क, मोरेवाडी, आर. के. नगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांसह शिवाजी विद्यापीठाच्या बी.टेक. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गोवा, आजरा, चंदगडसह कर्नाटकातील निपाणी, बेळगावकडे जाण्यासाठी आर.सी.सी बिल्डर हा स्टॉप सोयीस्कर आहे. त्यामुळे अनेकजण या ठिकाणी एस.टी.ची वाट पाहत थांबतात. अनेक वेळेला बसेस या ठिकाणी थांबण्याची विनंती करूनसुद्धा गाड्या थांबविल्या जात नाहीत. मात्र, कर्नाटकातील गाड्या थांबून प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे अनेकजण बेळगाव, निपाणीवरून येताना कर्नाटक गाड्यांना पहिली पसंती देतात. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील एस.टी.ला प्रवाशांची अॅलर्जी आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.मला तवंदी, शिपूर या गावी आठवड्यातून एक-दोनदा जावे लागते. जाते व येते वेळी आर.सी.सी. बिल्डर स्टॉप येथे एस.टी. बसगाड्या थांबत नाहीत. बऱ्याच वेळेला गावावरून येताना उशीर होतो. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर यावे लागते. तेथून परत आर. के. नगरला येण्यासाठी रिक्षाला ८० ते ९० रुपये भाडे जाते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. नानासाहेब पाटील, प्रवासी
एस. टी. ला प्रवाशांचे वावडे
By admin | Published: September 17, 2015 11:37 PM