मुरगूड : शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मळगे बुद्रुक येथील शालेय विद्यार्थिनीला किरकोळ कारणावरून एस. टी.च्या महिला वाहकाने मुरगूड एस. टी. स्टँडवरच जबर मारहाण केली होती. अल्पवयीन शालेय मुलीला मारहाण करून उलट पोलिसांच्या समोर दमदाटी करणाऱ्या वाहक व चालकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मळगे बुद्रुक (ता. कागल) येथील त्या मुलीच्या आई-वडिलांसह नागरिकांनी केली होती. त्यानुसार वाहक नीलम दत्तात्रय कुंभार व चालक सर्जेराव मिसाळ या दोघांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले असल्याची माहिती गारगोटी डेपो मॅनेजर अल्फ्रेड रॉड्रिक्स यांनी दिली. याशिवाय पंधरा दिवसांत याबाबत वाहक व चालक यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले. दरम्यान, उद्धट वर्तन करणाऱ्या वाहक कुंभार या दोन दिवस गैरहजर आहेत. एस. टी. चालक मिसाळ यांना मात्र निलंबनाचा आदेश दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येथील मुरगूड विद्यालयात ९ वी च्या वर्गात शिकणारी आसावरी संजय साबळे शुक्रवारी संध्याकाळी मैत्रिणींसह मळगेकडे जाण्यासाठी मुरगूड एस. टी. स्टँडवर गेली होती. येथे सर्व मुले एस. टी.ची वाट पाहत होते. इतक्यात स्टँडवर निपाणी-पंडिवरे (एम. एच.४० -एन ८४०६) या मार्गावर जाणारी बस आली. आसावरीने आपल्या मैत्रिणींसह या बसवर वाहक असणाऱ्या नीलम कुंभार यांना बस कोणती आहे असे विचारले. यावर कुंभार यांनी तुझे डोळे फुटलेत का? तुला बोर्ड दिसत नाही का?असे उद्धट उत्तर दिले. यातून वाद वाढत गेला. त्यावेळी कुंभारने स्टँडवरच सर्व प्रवाशांसमोर मुलीला शिव्या दिल्या व कंट्रोल रूममध्ये नेऊन जबर मारहाण केली. मुरगूड स्टँडचे नियंत्रक पी. बी. ठाणेकर यांना न विचारताच वाहक कुंभार यांनी एस. टी. मधील सर्व प्रवाशांना खाली उतरले होते. आसावरी रडत असताना ओढत बसमध्ये बसवले व चालक सर्जेराव मिसाळ, वाहक नीलम कुंभार या दोघांनी बससह त्या आसावरीला मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये नेले व पोलिसांच्या समोर चुकी नसताना तिला या दोघांनी दमदाटी केली. चालक-वाहकांची झाडाझडती होणार एस. टी.ला फायद्यात आणण्यासाठी परिवहन मंत्री रावतेंसह वरिष्ठ अधिकारी नवनवीन योजना राबवत आहेत, पण वाहक, चालक म्हणून काम करणारे बहुतांशी कर्मचारी प्रवाशांशी उद्धट वर्तन करताना दररोज दिसतात. यामुळे अनेक प्रवासी एस. टी. पासून लांब जात आहेत. महामंडळाद्वारे वाहकाने व चालकाने प्रवाशांशी सौजन्याने कसे वागावे याबाबत प्रबोधन शिबिर घेऊन उद्धट वर्तन करणाऱ्या चालक-वाहकांची चांगलीच कानउघाडणी केली जाणार असल्याचे एस.टी. चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एस. टी. वाहकासह चालकही निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2016 1:05 AM