गेल्या दोन दिवसांपासून लाॅकडाऊन कडक केल्यामुळे एस.टी. बसेसने प्रवास करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली. त्याचा परिणाम एस. टी.च्या उत्पन्नावर झाला. नियमित रोज लाखो कि.मी. अंतर प्रवास करणाऱ्या ५०० हून अधिक बसेस या कालावधीत थांबून होत्या, तर तीन हजार चालक व वाहक बसून होते. या दोन दिवसांच्या कालावधीत शनिवारी (दि. १०) आजरा, गडहिंग्लज, गारगोटी या मार्गावर केवळ पाच बसेस धावल्या. त्यातून त्या बसेसचा इंधन खर्चही निघाला नाही, तर रविवारी सकाळी याच मार्गावर दोन बसेस धावल्या. त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. रविवारी मुंबईहून केवळ १५ प्रवासी आले. त्यापैकी काहींना जिल्ह्याच्या विविध भागात जायचे होते. मात्र, त्यांनी एस.टी. बसेसचा आधार न घेता खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून एस.टी.च्या कोल्हापूर विभागास दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसला. मागणी आणि गरज ओळखून या विभागाने बहुतांशी बसेस व चालक, वाहकांची सज्जता ठेवली होती. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अल्प मिळाल्याने त्याचा वापरच झाला नाही.
कोट
गेल्या दोन दिवसांपासून सरकारने लाॅकडाऊन कडक केल्यामुळे प्रवाशांची संख्या रोडावली. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांत जाण्यासाठी बसेससह चालक, वाहकांची सज्जता कोल्हापूर विभागाने ठेवली होती. मात्र, त्याला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे दोन दिवसांत एक कोटी रुपयांचा तोटा या विभागास बसला .
रोहन पलंगे, विभागीय नियंत्रक, एस. टी. महामंडळ, कोल्हापूर विभाग