सातारा : सखींची लांबच लांब रांग... खचाखच भरलेले प्रांगण आणि सगळीकडे उत्साहाचा खळाळता झराच... निमित्त होतं सखी मंचच्या २०१७ मधील पहिल्याच हळदी-कुंकू कार्यक्रमाचं! येथील अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात गुरुवारी नवीन सदस्यांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी साडेपाच होती. पण सखी मंचचा कार्यक्रम म्हणजे लांबच लांब रांग अन् तुफान गर्दी हेच समीकरण तयार झाल्याने सदस्यांनी दुपारी साडेतीन वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी येण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी चार वाजता गेटसमोर गर्दी होऊन सखींची रांग अर्धा किलोमीटरपर्यंत गेली होती. प्रवेशद्वारातून आत जाताच सखी मंचच्या कार्यकारिणी सदस्या सुहास्य वंदनाने स्वागत करत होत्या. हळदी-कुंकू आणि तिळगूळसोबतच यावर्षी ‘लोकमत’तर्फे देण्यात आलेले वाण पाहताच सखींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सूर्योदय होताच देव्हाऱ्यातल्या देवापुढे प्रत्येकजण नतमस्तक होतो. याचाच विचार करून सखी मंचने यंदा देवाच्या प्रसादासाठी उपयोगी येणारी सिल्व्हर कोटिंगची डिझायनर वाटी प्रत्येक सखीला भेट देण्यात येत होती. हळदी-कुंकू कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक सखीला वेध लागले होते. ते खास पुण्याहून आलेले सिने अभिनेते व प्रसिद्ध निवेदक सचिन सावंत यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे. मानाची पैठणी तर सगळ्यांनाच खुणावत होती. पण इतर बक्षिसेही कुणाला मिळतील याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.मुख्य प्रायोजक कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे मार्केटिंग व्यवस्थापक आकाश शेळके, कविता चोरगे आणि राजेंद्र चोरगे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’, ‘ऐश्वर्या एम्पायर’च्या कविता चोरगे, ऐश्वर्या चोरगे, देवी ज्वेलर्सच्या मेघा देवी, नेचर ई-बझारचे चैतन्य नाडगौंडी, सलमान बागवान सुमुखी ब्युटी पार्लरच्या संजीवनी कदम आणि सचिन सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आकाश शेळके यांनी केआरए ज्वेलर्सच्या दागिन्यांची वैशिष्ट्ये, सुवर्ण संचय भिशी योजना तसेच खास सातारकरांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. ‘अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला... आॅक्सिजनच्या सानिध्यात’ हे ब्रीदवाक्य घेऊन निर्माण होत असलेल्या ‘ऐश्वर्या एम्पायर’ या प्रकल्पाची माहिती देण्यात आली.सचिन सावंत यांनी दिलखुलास निवेदन करून एकापेक्षा एक खेळ घेत कार्यक्रमात रंगत आणली. कधी रस्सीखेच तर कधी कॅटवॉक तर कधी खुर्ची-खुर्ची, रिंग बॉल्स, ग्लासेसचे खेळ घेतले. अधूनमधून सचिन भावोजींचे ठसकेबाज उखाणे आणि लज्जतदार विनोद सखींमध्ये हशा पिकवत होते. विविध खेळांमधून विजेत्या सखींमध्ये उपांत्य फेरीची स्पर्धा घेण्यात आली. त्यातूनच अंतिम सामन्यातून ज्योती पवार यांनी मानाची पैठणी जिंकली. त्यांना सचिन सावंत यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सखींना प्रश्न विचारून बरोबर उत्तरे देणाऱ्या सखींना गोल्डन फ्रेम व गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. (प्रतिनिधी)नवीन सदस्यांसाठी लवकरच लावणी महोत्सव या वर्षातील नवीन सदस्यांसाठी लवकरच ठसकेबाज ‘लावणी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. ज्या सखी अजूनही सभासद झाल्या नसतील त्यांच्यासाठी सभासद होण्याची संधी थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या विभागातील विभाग प्रतिनिधी किंवा ‘लोकमत’ कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सचिन भावोजींच्या ‘होम मिनिस्टर’मध्ये सखींची धम्माल!
By admin | Published: February 11, 2017 11:45 PM