लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या प्रभारी व्यवस्थापक पदी सचिन कृष्णराव सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना कार्यकारी संचालक पदाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तर संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांना आता चिटणीस म्हणून काम करावे लागणार आहे.
संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ हे दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. संघ आर्थिक अडचणीत असताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच दोन वर्षे पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार निर्मळ हे गेली दीड वर्षे मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. निर्मळ यांच्या वाहतूक भत्त्यावरून संचालक मंडळ व त्यांच्यात वाद झाला होता. यावर हरकत घेऊन लॉकडाऊनमध्ये सर्वच कर्मचारी कामावर येत आहेत, मग निर्मळ यांनाच वाहतूक भत्ता का द्यायचा? त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, असे संचालकांनी सुनावले. हाच मुद्दा उचलून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला जबाबदारीच्या पदावर ठेवणे उचित होणार नसल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्याचा ठराव करण्यात आला.
त्यानुसार, निर्मळ यांना चिटणीस करून त्यांच्या ठिकाणी सचिन सरनोबत यांना जबाबदारी देण्यात आली. त्याशिवाय अजिंक्य प्रकाश डांगे यांच्यावर सहाय्यक चिटणीस, धनाजी देसाई यांच्याकडे इन्चार्ज चिफ अकाउंटंट तर सुगंधा सुभाष पारळे यांच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.