प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी: मास्टरब्लास्टर, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज, सोमवारी पहाटे अचानक नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिरामध्ये हजेरी लावली. सचिनने पहाटे पाच वाजता काकड आरतीला उपस्थित राहून श्री दत्त चरणी प्रार्थना केली. मुलगा अर्जुन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे यासाठी सचिनने श्री दत्त चरणी साकडे घातले.आज, सोमवारी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली. पहाटेच्या काकड आरतीला सचिनने उपस्थिती लावली होती. नवल खोंबारे यांनी श्री दत्त चरणी प्रार्थना करून श्रीफळ प्रसाद दिला. यावेळी त्यांच्यासोबत सौरभ भोळे उपस्थित होते. पहाटेच्यावेळी मंदिरात गर्दी नसल्याने सचिनने रांगेतून दर्शन घेतले. दोघांनीही मास्क घातल्याने सचिनला ओळखता आले नाही.कोल्हापुरातील उद्योजक तेज घाटगे यांचे बंधू गौरव घाटगे यांनी तेज यांना फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे येणार असल्याची माहिती दिली. तेज घाटगे यांच्या मुडशिंगीच्या फार्म हाऊसवर रात्री दहाच्या सुमारास गाडीतून तेंडुलकर उतरले आणि घाटगे परिवाराला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. रात्री कोल्हापुरी पाहुणचार घेवून मुक्काम करून पहाटे चार नंतर तेंडुलकर नृसिंवाडीकडे रवाना झाले होते.
Sachin Tendulkar: अर्जुनसाठी सचिन तेंडुलकरचे नृसिंहवाडीत श्री दत्त चरणी साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 2:16 PM