इचलकरंजी : शहर व परिसरात खर्चीवाले पद्धतीच्या यंत्रमागधारकांची पिळवणूक होत असून, त्यांची स्थिती कामगारांसारखीच झाली आहे. कामगारांची वेतनवाढ, विजेची दरवाढ, अन्य प्रकारची महागाई, यामुळे पिचलेला खर्चीवाला यंत्रमागधारक आता उठावाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे वस्त्रनगरी पुन्हा आंदोलनाच्या उंबरठ्यावर उभी असल्याची चर्चा येथे आहे.शहर व परिसरात असलेल्या एक लाख यंत्रमागांपैकी सुमारे चाळीस टक्के यंत्रमाग जॉबवर्क पद्धतीने (खर्चीवाला) बड्या कापड व्यापाऱ्यांना कापड उत्पादित करून देतात. त्यासाठी ठराविक मजुरी दिली जाते. अशा मजुरीमधून हा यंत्रमागधारक कामगार, जॉबर, कांडीवाला, कापड चेकिंग व घडीवाला, दिवाणजी, वीज बिल, आदी खर्च जाऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतो. खर्चीवाला यंत्रमागधारकाला संबंधित कापड व्यापाऱ्याकडून प्रत्येक आठवड्याला रक्कम देऊन त्या रकमेतून यंत्रमागधारक उपरोक्त खर्च चालवित असतो. दीपावली सणापासून सुरू होणारे आर्थिक वर्ष दुसऱ्या दीपावलीला संपत असते. दरम्यानच्या काळात यंत्रमागधारकाला देण्यात आलेली सुताची बिमे व सुताचे कोन यापासून तयार करून यंत्रमागधारकाने संबंधित कापड व्यापाऱ्याला दिलेले कापड याचा वार्षिक ताळमेळ घातला जातो. या हिशेबानंतरच यंत्रमागधारकाला प्रत्येक आठवड्याला दिलेली अॅडव्हान्स रक्कम यांची बेरीज करून दीपावली सणाला राहिलेली रक्कम दिली जाते. या रकमेतूनच खर्चीवाला यंत्रमागधारक त्यांच्याकडे असलेले कामगार व अन्य कर्मचाऱ्यांचा दीपावली बोनस भागवित असतो.अशा प्रकारचा प्रघात गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, अशा व्यवहारासाठी काही कापड व्यापाऱ्यांकडून कोरे धनादेश घेणे, कारखानदाराकडे असलेले यंत्रमागाचे बॉँड करून आपल्याजवळ ठेवणे, असेही प्रकार करतात. प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला हिशेब करून त्याचा ताळमेळ घातला जात नसल्याने अनेकवेळा खर्चीवाला कारखानदार नुकसानीत गेल्याचे प्रकार घडले आहेत. काही व्यापाऱ्यांकडून वेळच्या वेळी हिशेब दिला जात नसल्याने वर्षाच्या अखेरीस व्यापारी जो हिशेब करतील, ते खरे मांडण्याचा प्रसंग यंत्रमागधारकावर येत असतो. या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी कारखानदारांकडील कोऱ्या धनादेशांचा किंवा प्रसंगी बॉँड करून दिलेल्या यंत्रमागाचा वापर करण्याच्या कटू घटना वस्त्रनगरीत घडल्या आहेत. अशा स्थितीमध्ये चक्रात अडकलेल्या खर्चीवाला यंत्रमागधारकांची संख्या सुमारे वीस टक्के आहे. मात्र, या वीस टक्क्यांमुळेच येथील यंत्रमाग उद्योग बदनाम होत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यंत्रमागधारक संघटनांकडे येऊनसुद्धा मध्यस्थी करणाऱ्यांना संघर्ष करावा लागण्याचे प्रसंग येत आहेत. ठरल्याप्रमाणे वस्त्रोद्योगात तेजी असताना मजुरी मिळते. मात्र, मंदीच्यावेळी कामगार वेतनासह अन्य कोणत्याही खर्चामध्ये कपात झाली नसली तरी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये कापड व्यापारी कपात करतात. याचाही मोठा फटका यंत्रमागधारकांना बसू लागला आहे. त्यामुळे यंत्रमागधारक आता अशा पिळवणुकीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. (प्रतिनिधी)पिळवणुकीसाठी अनेक क्लृप्त्याकापड व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांना अडचणीत आणून त्याची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवितात. त्यामध्ये ठरलेल्या पेक्षा कमी काऊंटचे सूत देणे. कारखानदारांकडे असलेली डिलिव्हरी व पेमेंटची पुस्तके स्वत:कडे ठेवून घेणे. कारखानदार पेढीवर आल्यानंतरच त्याचा हिशेब स्वत:च्या पद्धतीने करणे. कमी लांबीची सूत बिमे देऊन फसवणे. कारखानदारांनी दिलेल्या कापडामध्ये वर्षानंतर हिशेब करताना खोट काढणे, अशा प्रकारे कारखानदारांना लुटले जात असल्याची माहिती या क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रमागधारक संघटनेच्या संचालकांनी सांगितली.
खर्चीवाला यंत्रमागधारक उठावाच्या पवित्र्यात
By admin | Published: February 05, 2016 11:27 PM