प्रवीण देसाई ।कोल्हापूर : देशाच्या रक्षणासाठी छातीवर गोळी झेलत आपले रक्त सांडणाऱ्या वीर जवानांची व शौर्याची कोल्हापूर ही रणभूमी आहे. या भूमीतून १९६२ पासून आतापर्यंत ११८ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदान तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. त्याचबरोबर अनेक जवान आजही देशसेवेसाठी सीमेवर लढत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांच्या धगधगत्या शौर्याचा इतिहास व बलिदानाची परंपरा सांगणारी ही कोल्हापूरची रणभूमी आहे. हिने देशाच्या रक्षणासाठी आतापर्यंत हजारो जवान दिले आहेत. त्यांतील अनेक जवान भारत-पाकिस्तान व भारत-चीनच्या सीमेवर शत्रूशी लढताना धारातीर्थी पडले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरचे भरतीचे प्रमाण अधिक आहे. १९६२ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ११८ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये शहीद जवान अभिजित सूर्यवंशी (कोल्हापूर), जवान दिगंबर उलपे (कसबा बावडा), जवान नारायण तुपारे (कार्वे, ता. चंदगड), जवान महादेव तुपार (महिपालगड, ता. चंदगड), जवान सावन माने (गोगवे, ता. शाहूवाडी), प्रवीण येलकर (भैरेवाडी, ता. आजरा), अनंत धुरी (बेलेभट, ता. चंदगड) अशा अलीकडच्या काळातील निवडक जवानांची नावे घ्यावी लागतील. या शहीद जवानांचे बलिदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाºया या जवानांच्या स्मृतींना ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उजाळा मिळाला आहे.लष्करातील मोठ्या हुद्द्यांवरील कोल्हापूरचे वीरलष्करात मोठ्या हुद्द्यावर जाऊन देशसेवा करण्याची परंपरा कोल्हापूरचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल (कै.) एस. पी. पी. थोरात यांच्यापासून सुरू झाली आहे. यानंतर आतापर्यंत मेजर जनरल शिवाजीराव पाटील (कसबा वाळवे, ता. राधानगरी), मेजर जनरल ए. बी. सय्यद (ताराबाई पार्क, कोल्हापूर), मेजर जनरल मधुकर काशीद (आर. के.नगर, कोल्हापूर), मेजर जनरल उदयकुमार उपाध्ये (न्यू पॅलेस परिसर, कोल्हापूर), ब्रिगेडीअर विजयसिंह घोरपडे (साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर), ब्रिगेडीअर उदय थोरात (कसबा बावडा रोड, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. ते निवृत्तीनंतरही लष्करात येणाºया तरुणांसाठी प्रेरणादायी असून आदर्शवत आहेत. तसेच देशासाठी शहीद झालेल्या कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये शहीद कर्नल जयवंत व्ही. महाडिक (कोल्हापूर) व शहीद मेजर सत्यजित शिंदे (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.