कोल्हापूर : भाजपच्या बुथ कार्यकर्ते मेळाव्यामध्ये उपस्थित राहत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. भाजपच्या चिन्हावर विधान परिषदेचे आमदार बनलेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाच्या व्यासपीठावर येत मार्गदर्शनही केले. येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.दोन सत्रांमध्ये या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी भाजपच्या शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार अमल महाडिक, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सत्यजित कदम, आशिष ढवळे यांच्यासह शहर पदाधिकारी उपस्थित होते.याच पद्धतीने दुपारच्या सत्रात ग्रामीण भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्ते एकत्र येत असतानाच मंत्री खोत यांची गाडी थेट बैठकीच्या ठिकाणी आल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले. मात्र, खोत यांनी थेट व्यासपीठावर आसन ग्रहण केल्याने कार्यकर्त्यांना विषय लक्षात आला. खोत यांचे काही कार्यकर्तेही ‘रयत शेतकरी संघटना’ असा बिल्ला लावून बसले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी संघटनमंत्री बाबा देसाई यांनी स्वागत केले. हिंदुराव शेळके यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी मार्गदर्शन केले. पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी बूथरचना महत्त्वाची आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे या कामाकडे बारकाईने लक्ष आहे म्हणूनच कार्यकर्त्यांनी ही रचना महत्त्वाची मानून लक्ष केंद्रित करावे.
पक्षाने नवे जे उपक्रम आखले आहेत याचीही माहिती यावेळी आमदार हाळवणकर यांनी दिली. पक्षाच्या मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला पाहिजे, या अमित शहा यांच्या सूचनेनुसारच सदाभाऊ खोत या ठिकाणी आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मंत्री खोत म्हणाले, भाजपचे अशा पद्धतीचे नियोजनबद्ध काम हेच सांगलीच्या यशाचे गमक आहे. अशा पद्धतीचे काम मी महाराष्ट्रात कुठे पाहिले नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यक्रमाला जाण्याआधी माझ्या कार्यालयातून कार्यकर्त्यांना एसएमएस करणे सुरू केले आहे. अन्य तालुक्यांतही जेव्हा बोलवाल तेव्हा निश्चितच मी उपस्थित राहणार आहे.
आरोग्य सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलगरजूंना ८ कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी आजऱ्याच्या नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे, जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद जोशींची आठवणभाजपच्या कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम दिले आहेत ते पाहून मला शरद जोशींची आठवण झाली. ते देखील आम्हा कार्यकर्त्यांना खूप कार्यक्रम द्यायचे. ते राबवण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र संघटनेच्या कामात वेळ कसा जायचा हे कळायचे नाही, अशीही आठवण खोत यांनी सांगितली.