शिरोली : सादळे मादळे, कासारवाडी भागात ओपन बार जोरात फोफावले असून, येथील डोंगरात मद्यपी काचेच्या व प्लास्टिक बाटल्या टाकत असल्याने येथील निसर्गसौंदर्य धोक्यात येऊ लागले आहे. मद्यपींच्या कारनाम्यामुळे अलीकडच्या काळात प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या या परिसराचे नाव बदनाम होऊ लागले आहे. त्यामुळे या तळीरामांवर वेळीच आवर घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कासारवाडी घाट रस्त्यात सादळे मादळे परिसरात मद्यपी रस्त्याकडेला डोंगरात उघड्यावरच दिवसा आणि रात्री मद्य पीत बसलेले असतात. अनेकवेळा हे तळीराम रात्रीच्यावेळी गोंधळ घालत असल्याने या परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून येणा-जाणाऱ्या प्रवाशांनाही या मद्यपींचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ओपन बार संकल्पना वाढली
या परिसरात अनेकजण टोळक्यांनी येत उघड्यावरच मद्यपान करीत असतात. निसर्गरम्य निर्जन ठिकाणे त्यांनी आपला अड्डा बनविल्याने चिंता वाढली आहे. तळीरामांचे टोळके उघड्यावरती बसून मद्यपान करीत असल्याने ओपन बार ही नवी संकल्पना वाढीस लागली आहे. विशेष म्हणजे मद्यपान केल्यानंतर परत जातानाही मद्यधुंद अवस्थेत मद्यपी वेगाने गाड्या चालवीत असल्याने अनेक अपघातांच्या घडना घडत आहेत. मद्यपींबरोबरच वादावादीचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत.
दिवसाही उच्छाद : सादळे-मादळे आणि कासारवाडी घाटात मद्यपी दिवसाही ओल्या पार्ट्या करीत असल्याने स्थानिक शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मोठ्या आवाजात गाणी लावून अश्लील नृत्य करीत मद्यपी तरुण हुल्लडबाजी करताना दिसून येतात. याचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे. दुसरीकडे सादळे मादळे येथील अनेक फार्म हाऊसवर ओल्या पार्ट्या जोरात होतात. म्युझिक सिस्टीम लावून नका करून नंगानाच सुरू असतो.
फोटो ओळ०२ सादळे मादळे ओपन बार
सादळे मादळेे कासारवाडी डोंगर परिसरात तळीरामांनी फेकलेल्या बाटल्या. तळीरामांचे अड्डे बनले आहेत. याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत आहे.