अनिल पाटीलमुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना सण समारंभा मधून एकत्र येण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत आहे. पण याला अपवाद कागल तालुक्यातील यमगे या गावातील सरनोबत कुटुंब आहे. शेकडो वर्षांपासून सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या या कुटुंबात एकच गणपती बसवला जातो. सर्व धार्मिक विधी सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात साजरे करत आहेत. समतेचा, एकतेचा संदेश देणारा सरनोबतांचा गणपती विभक्त कुटुंब व्यवस्थेला नक्कीच मार्गदर्शक आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे आचार विचारांची देवाण घेवाण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरवात केली. पण झपाट्याने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत हा मूळ हेतू मात्र दूर जाताना पहावयास मिळत आहे. मात्र, यमगे येथील सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवाती पासूनच सुमारे दोनशे कुटुंबसदस्यामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले सर्व सदस्य गणेशोत्सवात एकत्र येतात.धान्य देऊन बनवून घेतली जाते श्री'ची मूर्तीसरनोबत गल्ली येथील सदाशिव दत्तात्रय सरनोबत पाटील यांच्या घरी अगदी विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातीलच कुंभार समाजाकडून धान्य देऊन अडीच तीन फूटाची शाडूची आकर्षक मूर्ती बनवून घेतली जाते. गणेशाच्या आगमनासाठी सुमारे पन्नास ते साठजण एकत्रित गणेशाचा जयजयकार करत जाऊन डोक्यावरून गणेश मूर्ती आणतात. गणेशाच्या आगमना पासून विसर्जना पर्यंत घरातील सर्वच सदस्य एकत्र आरती करतात.मुस्लिम बांधवांचाही सहभागीएखाद्या दिवशी प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो. त्याच दिवशी या परिवारामार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शिवाय गौरी जागरण करण्यासाठी दररोज रात्री परिसरातील महिला एकत्रित येत पारंपरिक गीतांचे सादरीकरण करतात. उत्सव काळात शेजारील मुस्लिम बांधवही सर्व कार्यक्रमात सहभागी असतात. गणेश विसर्जन अत्यंत साधेपणाने केले जाते. त्यामुळे समतेचा संदेश देणारा हा सरनोबतांचा गणपती परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' गावात दोनशे जणांच्या कुटुंबात बसवला जातो एकच गणपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 4:50 PM