कोल्हापूर : शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.३) दुपारी १२ वाजता पंढरपुर येथील चारोधाम मंडप येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रश्नी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करावा असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी परिषदेमध्ये आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करुन जिरायत शेतीला एकरी ५० हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, रेडीरेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत.कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी मंत्री सदाभाऊ खोतवर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांनी खुलासा करावा. त्याचबरोबर या घोटाळ्यातील दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी.ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक शेतकरी संघटना लढविणार आहे. कॉँग्रेस व भाजपा सोडून समविचारी पक्षांना सोबत घेतले जाणार आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे आदी उपस्थित होेते.