कोल्हापूर : साधू व साध्वींच्या माध्यमातून संसद चालविण्याची भाजपची नीती असून ती देशाच्या ऐक्याला घातक असल्याची टीका कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. देशाची एकात्मता टिकविण्यासाठी कर्तबगार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहा, असे आवाहनही त्यांनी केले.राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जवाहरनगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोणालाही किंमत नसून ‘हम करेसो कायदा’ असेच त्याचे स्वरूप आहे. त्यांना रशियाचे राष्टÑाध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणे हुकूमशहा बनायचे आहे. भाजपला निष्ठावंतांपेक्षा साधू व साध्वींना संसदेत पाठवायचे आहे. या नीतीमुळे देशाचे संविधान धोक्यात आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची चिरफाड कोणीही सहन करणार नाही.धनंजय महाडिक यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून सोलापुरात, तर खासदारकीच्या माध्यमातून कोल्हापुरात उत्कृष्ट काम केले आहे. आपण अनेक वर्षे संसदेत काम केले; पण अभ्यासू, तरुण खासदार म्हणून महाडिक यांनी लौकिक मिळविला. संसदरत्न पुरस्कार मिळविणे सोपे नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, नगरसेविका रूपाराणी निकम, राजू घोरपडे, निरंजन कदम, नगरसेवक हरिदास सोनवणे, आर. के. पोवार, फिरोज सौदागर यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका सविता घोरपडे, प्रकाश सातपुते, जहीदा मुजावर, आदी उपस्थित होते. कृष्णराज महाडिक यांनी आभार मानले.मदत करणारे अडवाणी अडगळीतगोध्रा हत्याकांडावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे,’ असे संसदेत सांगितले होते; पण लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींची बाजू घेऊन वाचविले. त्याच अडवाणींना पाच वर्षांत संसदेत तोंड उघडू दिले नाही, आता तर त्यांना अडगळीत टाकले. या उलट माझ्यासारख्या ७८ वर्षांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी उमेदवारी देऊन सन्मान केला.
Lok Sabha Election 2019 साधू-साध्वींकडून संसद चालविण्याची भाजपची नीती; सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:45 AM