कोल्हापूर : महान मल्ल सादिक पंजाबी यांची कोल्हापूरला येण्याची इच्छा अपूर्ण राहिली. खरा दोस्त गमावला. पैलवान पेशातील पथ्ये पाळणारा मल्ल हरपला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत कुस्तीक्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी सादिक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.
माझ्यात आणि सादिकमध्ये वयात फारसे अंतर नव्हते. पंजाबी, राजबिंडा दिसणारा सादिक कुस्तीच्या मैदानात अत्यंत चपळाईने समोरच्या मल्लाला चितपट करायचा. जगण्यात मात्र साधा, सालस होता. कोल्हापूरवर त्याचे निस्सीम प्रेम होते. ८० च्या दशकात काही काळ कोल्हापुरात कुस्ती करण्यासाठी तो आला होता. त्याच्यावर आणि त्याच्या कुस्ती कौशल्यावर जुन्या कुस्तीगिरांचे प्रेम होते. त्याच्या निधनामुळे खरा दोस्त गमावल्याचे दुःख होत आहे.- बाळ गायकवाड, मुख्य संघटक, कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघपैलवान सादिक पंजाबी यांच्याबद्दल कुस्तीगीर आणि कुस्तीप्रेमींमध्ये आदर होता. मारुती माने, गणपतराव आंदळकर, सादिक पंजाबी, आदींमुळे महाराष्ट्रातील कुस्तीने सुवर्णकाळ अनुभवला. सादिक हे कुस्तीसाठी मैदानात ह्यये अली मौला मददह्ण असे म्हणत प्रचंड आत्मविश्वासासह उतरायचे. त्याचवेळी त्यांनी निम्मी कुस्ती जिंंकलेली असायची. त्यांच्या कुस्तीकौशल्यामुळे ते माझे आयडॉल बनले. सरावासाठी सादिक हे काहीकाळ कोल्हापुरात आले. येथील मातीशी त्यांची नाळ जुळली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्याशी त्यांची मैत्री होती. ते एकमेकांच्या संपर्कात होते. पैलवान सादिक यांची पुन्हा एकदा कोल्हापूरला येण्याची आणि इथल्या पंचगंगा नदी, रंकाळा तलावावर फेरफटका मारण्याची इच्छा होती आणि त्यांनी ती त्यांच्या मुलाजवळ व्यक्त केली होती. ही इच्छा त्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी हिंदकेसरी खंचनाळे यांना दूरध्वनीवरून सांगितली होती. कोल्हापूरला येण्याची सादिक यांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांच्या निधनामुळे कुस्तीतील एक हिरा हरपला आहे.- नंदकुमार विभूते, राज्य कुस्ती संघटक, सातारा
सादिक पैलवान महान होते. महाराष्ट्रात बड्या-बड्या मल्लांबरोबर त्यांच्या कुस्त्या झाल्या. या ठिकाणी त्यांचा नावलौकिक झाला. मला सांगायला अभिमान वाटतोय की, ज्यावेळी सरावासाठी ते सांगलीतील आमच्या तालमीत आले होते, त्यावेळी मीदेखील तेथे सराव करत होतो. त्यांची मेहनत आणि कुस्त्या आम्ही पाहिल्या आहेत. पैलवान पेशातील पथ्ये पाळणारा मल्ल अशी त्यांची ओळख होती. स्वभावाने ते फार चांगले होते. त्यांना गर्व नव्हता. एक मोठा पैलवान कुस्तीक्षेत्रातून हरपला आहे. त्यांना सर्व कुस्तीगीरांच्या वतीने आदरांजली वाहतो.- नामदेवराव मोहिते, अध्यक्ष, सांगली जिल्हा तालीम संघ