कोल्हापूर : आठ वर्षांपूर्वी देशभर तब्बल २५० हाऊसफुल्ल प्रयोग करून कोल्हापूरच्या कलाकारांची व्यावसायिक नाट्यपरंपरेची नव्याने ओळख करून देणारे ‘सोकाजीराव टांगमारे’ हे लोकनाट्य बाजाचे विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. शनिवारी (दि. १३ ) पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात, तर दि. २१ रोजी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात हे नाटक नव्या ढंगात, नव्या रूपात नाट्यप्रेमींच्या भेटीला येत आहे.
मित्राय प्रॉडक्शनचे स्वप्निल यादव, कलाकार संजय मोहिते, राजश्री खटावकर, अमोल नाईक यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत नाटकाच्या पुनरागमनाची घोषणा केली. कथालेखक द. मा. मिरासदार यांच्या व्यंगात्मक लेखणीतून १९६५ मध्ये मी तुमची लाडाची मैना या नावाने लोकनाट्यवजा वगनाट्य लिहिले. या कथेवर निळू फुले, उषा नाईक यांच्यासह दिग्गज कलाकारांनी लाडाची मैना नावाचे नाटक केले. ते तुफान चालले. पुढे हे नाटक व्यावसायिक समीकरणात बसविण्याचा विचार झाला, त्याचा अभ्यास होऊन जानेवारी २००७ मध्ये सोकाजीराव टांगमारे या नावाने नाटक कोल्हापुरात सादर झाले. संजय मोहिते यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने तुफान प्रसिद्धी मिळवत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
२००७ पासून २०१२ पर्यंत संपूर्ण राज्यासह कर्नाटक, गोव्यातही या नाटकाचे प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाने २०० प्रयोगाचा टप्पा पार केला. त्यानंतर मात्र काही अडचणीमुळे हे नाटक थांबले.
आता कोरोनानंतरच्या जगाचे संदर्भ, राजकीय शेरेबाजी, घोटाळे असे संदर्भ घेत काैटुंबिकतेतून सामाजिक व्यंगावर भाष्य करत हसता हसता अंतर्मुख करायला लावणारे हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. पुण्यातील प्रयोगाला ९४ वर्षीय द. मा. मिरासदार स्वत: उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातील प्रयोग स्थानिक कलाकारांच्याच उपस्थितीत होत आहे. त्याचे बुकिंग १८ पासून सुरू होत आहे.
चौकट ०१
कोल्हापूूरकरांनो, लोकाश्रय द्या
नाटकाला राजाश्रय उरला नाही. आता लोकाश्रयच कलाकारांना प्रोत्साहन देऊ शकतो. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेले हे नाटक असे फिनिक्स भरारी घेण्यासाठी कोल्हापूरकरांचे सहकार्य हवे, अशी अपेक्षा या नाटकातील कलाकारांनी व्यक्त केली.