कोगनोळी : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमेवर तैनात असणाऱ्या निपाणी व कागल पोलिसांनी रोखले. त्यानंतर शिवसैनिकांनी छुप्या मार्गाने निपाणी तालुक्यातील हदनाळ या गावांमध्ये प्रवेश करून तेथील कन्नड फलकासमोर भगवा ध्वज फडकावला.
बेळगाव महापालिकेसमोर अज्ञातांनी फडकविलेला लाल-पिवळा ध्वज हटवण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा व सीमाभागातील मराठी भाषिक अनेक आंदोलने करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दिनांक ८ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहतील व प्रक्षोभक भाषण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शिवसैनिकांना जिल्हाबंदीचे आदेश लागू केले होते. या आदेशाला झुगारून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह सुमारे ५० शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील दूधगंगा नदीवर सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या बंदी आदेशाची होळी केली व बेळगावकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कागल पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी सीमेवर महाराष्ट्र, कर्नाटक पोलीस व शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर विजय देवणे, अशोक पाटील, विराज पाटील, भिकाजी हळदकर, प्रकाश पाटील आदी काही मोजक्या शिवसैनिकांनी आडमार्गाने कर्नाटक हद्दीतील हदनाळ या गावात प्रवेश करून तेथील कन्नड फलकासमोर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावला. कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांवर चालविलेल्या अन्यायाचा निषेध केला.
यावेळी संजय पवार, सुजित चव्हाण, शिवगोंड पाटील, भरतेश पाटील, विनोद खोत, बाबूराव शेवाळे, सरदार तिप्पे, दत्ता खोत, विद्या गिरी, कांचन माने, दीपाली घोरपडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट
महिला दिन पोलीस स्थानकात या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या विद्या गिरी, कांचन माने, दीपाली घोरपडे या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
छाया : बाबासो हळिज्वाळे