सचिन भोसले
कोल्हापूर : नुसता मृतदेह पाहिला तरी हात, पाय गळून पडतात, तिथे मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे म्हटले तर नुसते नाव ऐकूनच बोबडी वळते, त्यातही हे काम करायचे तर मद्यपान हे केलेलेच असते, असा समज दृढ झालेला; पण कोल्हापुरातील सागर सारंगधर या पस्तिशीतील तरुणाने हा समज खोडून काढत निर्व्यसनी राहून गेल्या १५ वर्षांत तब्बल १४ हजारांवर मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. त्याचे काम पाहिले की मृतदेहाची चिरफाड करायची तर वाघाचं काळीज लागतं, याची प्रचिती येते.
एखाद्याचा अपघातात किंवा खून झाला आणि त्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, त्याचे कारण शवविच्छेदनातून शोधले जाते. त्याचा अहवाल नातेवाइकांना व पोलिसांकडे दिला जातो. हे अत्यंत कठीण काम आपल्याला वडिलांमुळे शक्य झाल्याचे तो आवार्जून सांगतो.
आतापर्यंत १४ हजार मृतदेहांचे शवविच्छेदन
सागरने गेल्या १५ वर्षांत सीपीआर रुग्णालयात अपघात, घातपात, विषारी औषध प्राशन करून अथवा संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्ती अशा छिन्नविछिन्न १४ हजार मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. दिवसाकाठी ते सरासरी पाच ते सहा मृतदेहाचे शवविच्छेदन करतात.
प्रत्येक अवयव वेगळा करावा लागतो
एखाद्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे पाहण्यासाठी त्या शरीरातील प्रत्येक अवयव वेगळा केला जातो. यात प्रथम हृदय, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंडे, पोट आणि सरतेशेवटी मेंदूची तपासणी करण्यासाठी डोक्याची बाजू खोलली जाते. या सर्व अवयवांवर काय परिणाम अर्थात मारहाण, अपघातात इजा होणे याची माहिती कळते आणि त्याचा अहवाल डाॅक्टर बनवितात. हाच शवविच्छेदन अहवाल होय.
पहिल्यांदा शवविच्छेदन करताना हात थरथरले
सागरचे वडील प्रकाश सारंगधर हे निवृत्त झाले. त्यांच्या जागी सागर याच पदावर नोकरीस लागला. प्रथम त्याचे मन असे काम करण्यास धजेना. वडिलांनी त्याला आपल्या मार्गदर्शनाखाली पहिले शवविच्छेदन करण्यास सांगितले. त्याने सुरुवात केली आणि त्याच्या अंगाला घाम फुटला, हात थरथरायला लागले. उपस्थित डाॅक्टर आणि वडिलांनी धीर दिला आणि तो दिवस सरला.
वडिलांकडूनच मिळाला वारसा
सागरचे वडील प्रकाश सारंगधर हे सीपीआर रुग्णालयात हेच काम करीत होते. त्यांनी सागरला हे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच्या सुरुवातीच्या काळात सागरसोबत त्याच्या वडिलांनी तीन महिने काम केले. पहिल्या दहा दिवसांत प्रत्येक अवयव कसा डाॅक्टरांना दाखवायचा, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.
वडील करीत असलेले सेवाभावी काम मी लहानपणापासून बघत होतो. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी हे काम करीत आहे. शवविच्छेदन असले तरी ते काम समजून मी प्रामाणिकपणे करतो. -सागर सारंगधर