सुनील चौगले-- आमजाई व्हरवडे --परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी भाग घेण्याचे निश्चित केले असून, भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांना पाठबळ देण्याचे संकेत दिल्याने, भोगावतीच्या राजकरणात आ. पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी खासदार धनंजय महाडिक व महादेवराव महाडिक हेही भाग घेणार हे स्पष्ट आहे.भोगावती साखर कारखान्यावर सध्या प्रशासक नियुक्त आहे. कोणत्याही क्षणी ‘भोगावती’ची निवडणूक होण्याची शक्यता आहे. भोगावतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखाली भोगावतीच्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करून सतेज पाटील यांचा सत्कार केला होता. यावेळी पाटील यांनी आगामी भोगावतीच्या निवडणुकीत आपण सदाशिवराव चरापले यांच्या पाठीशी राहण्याची घोषणा करून भोगावतीच्या राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.२०११ च्या निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भोगावतीच्या राजकरणात उडी घेतली आणि पी. एन. पाटील यांच्या वीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत शेकाप व मित्र पक्षांना बरोबर घेत भोगावतीची सत्ता राष्ट्रवादीला मिळवून दिली. आगामी भोगावतीची निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातच होणार आहे. शेकाप, ज. दल, सेनेची साथ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. लढत दुरंगी होणार की तिरंगी हे चरापले यांच्या भूमिकेवरच ठरणार आहे. सतेज पाटील यांचा ‘भोगावती’तील प्रवेश अडचणीचाचसतेज पाटील यांनी ‘भोगावती’च्या राजकारणात चरापले यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, भोगावतीच्या राजकारणात भाग घेताना बंटी यांना अडचणीच अधिक असल्याचे समोर येत आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पाठबळ दिले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या तिघांच्यामुळे तर सतेज पाटील आमदार झाले आहेत. भोगावतीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीतच सामना होणार असल्याने भोगावतीत कोणाच्या विरोधात जाऊन लढायचे हे आव्हान असल्याचे सतेज यांना भोगावती प्रवेश त्यांना अडचणीचाच ठरणार आहे.
‘भोगावती’च्या राजकारणात सतेज यांची उडी
By admin | Published: April 13, 2016 9:23 PM