लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली. मराठीतील दोन साहित्यिकांना यंदाचे पुरस्कार जाहिर झाले आहेत. अकादमीचा युवा पुरस्कार राधानगरी तालुक्यातील राहुल पांडुरंग कोसंबी यांच्या "उभं-आडवं" या कथासंग्रहाला तर एल. एम. कडू यांच्या खारीचा वाटा या पुस्तकाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला.अकादमीने २४ भाषांतील पुरस्काराची घोषणा विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गुरुवारी गुवाहाटी येथे केली. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे विशेष सोहळ्यात होणार आहे.
"उभं आडवं" हे राहुल कोसंबी यांचा वैचारिक लेख संग्रह आहे. त्यांनी "उभं आडवं" या पुस्तकातून समाजातील वास्तवावर लिखाण केलं आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी विश्लेषण केलं आहे. तसंच यातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भान दिसून येते. पुस्तकातील त्यांच्या विवेचन परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलले आहे. राहुल कोसंबी हे राधानगरी तालुक्यातील चांदेकोते येथील रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हलकर्णी (ता. चंदगड) येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले आहे. त्यांनी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट आॅफ इंडिया येथे मराठी व कोकणी भाषेचे संपादक म्हणून २००८ पासून २०१५ पर्यंत त्यांनी काम पाहिले आहे.
मे २०१५ पासून एनबीटीच्या पश्चिम क्षेत्रीय मुंबई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. सध्या ते मुक्त शब्द मासिकासाठी ते सल्लागार संपादक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई येथे पार पडलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनामधील समीक्षेच्या चर्चासत्रामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मराठी साहित्य संमेलनाबरोबरच राष्ट्रीय चर्चासत्रामधूनही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.