कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला ३५ कोटी रुपये विमा करून देणाऱ्या ‘त्या’ खासगी वित्तीय बँकेच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर पवार याने ज्या नगरसेवकांकडून, खासगी सावकारांकडून पैसे घेतले असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्यास त्या नगरसेवक, खासगी सावकारांना सहआरोपी करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, गडहिंग्लजमधील रमेश नायक खूनप्रकरणी संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक याला घेऊन सोमवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस तपासासाठी गडहिंग्लज, आजरा परिसरात घेऊन गेले होते. याबाबत प्रदीप देशपांडे यांनी, अमोल पवार याने एका खासगी वित्तीय पुरवठा करणाऱ्या बँकेकडे ३५ कोटी रुपयांचा विमा काढला होता. या प्रकरणी या बँकेतील संबंधित अधिकारी, एजंटांची चौकशी करणार आहे तसेच अमोल पवार याने ज्या खासगी सावकार, नगरसेवकांकडून पैसे घेतले असतील तर त्यांचीही चौकशी करणार आहे. त्यात जर खासगी सावकार, नगरसेवक दोषी आढळून आला तर त्याच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करून त्यांनाही सहआरोपी करू, तो तपास अधिकाऱ्यांना कोणतीही व्यवस्थित माहिती देत नाही व मालमत्तेसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती देत आहे. त्याचबरोबर अमोल पवार याने दिलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे तसेच या प्रकरणात आणखी कुणा-कुणाचा सहभाग आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गेल्या आठवड्यात उघडकीस आणला. गडहिंग्लजमधील रमेश नायक या तरुणाला काम देतो, असे सांगून संशयित अमोल पवार व त्याचा सख्खा भाऊ विनायक या दोघांनी कारमधून नेऊन आजरा-आंबोली या मार्गावर रमेश नायक याला कारसह जाळले होते. अमोल पवार याने ३५ कोटी रुपयांचा विमा मिळावा यासाठी हा आपल्याच मृत्यूचा बनाव केला होता. रमेश नायक खूनप्रकरणी पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)पवार बंधूंची दुचाकी जप्तसंशयित अमोल पवार व त्याचा थोरला भाऊ विनायक यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. रमेश नायक याचा खून करण्यापूर्वी विनायक दुचाकीवरून आजरा परिसरात आला होता. रमेशचा खून केल्यानंतर दोघेही दुचाकीवरून घेऊन कोल्हापूरच्या दिशेने आले असल्याचे तपासांत स्पष्ट होत आहे.अर्थपुरवठा व्हीनस कॉर्नर, शाहूपुरीतून...संशयित अमोल पवारने व्हीनस कॉर्नर परिसरातील एका सहकारी बँकेतून तर शाहूपुरी परिसरातील एका पतसंस्थेतून कर्ज घेतले असल्याचे पोलीस तपासांत स्पष्ट होत आहे. ही बँक एका माजी आमदारांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मिरज पोलिसांनी जे तीन कोटी रुपये जप्त केले, त्यातील नोटांच्या बंडलवर जे सील आहे, ते देखील कोल्हापूर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील एका सहकारी बँकेचे असल्याचे समजते. त्यामुळे या बँकेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
अमोल याला पैसे देणारे सहआरोपी
By admin | Published: March 15, 2016 1:09 AM