कोल्हापूर : मुंबईसह रायगड ,ठाणे, आदी ठिकाणी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईकडून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली; तर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व कोयना एक्सप्रेस या रेल्वेगाड्या केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून बुधवारी रात्री देण्यात आली आहे.गेले दोन दिवस मुंबईसह रायगड, ठाणे ,पालघर, आदी भागांत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे लोकलसह सर्वच रेल्वेगाड्या ठप्प झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापुरातून सुटणारी महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस केवळ पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे; तर सकाळी सुटणारी कोयना एक्सप्रेसही पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे.
याशिवाय मुंबईहून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी एस. टी., खासगी आरामबस सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबतची माहिती छत्रपती शाहू रेल्वे टर्मिनसचे व्यवस्थापक ए. आर. फर्नांडिस यांनी दिली.