दत्ता लोकरे
सरवडे : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड ) संत बाळुमामांचा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी देवालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आदमापूर पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाळुमामा मंदिरामध्ये गाभाऱ्यात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती. बाळूमामांचा पाळणा झेंडूच्या फुलांनी व जरबेरा फुलांनी आकर्षकपणे सजवला होता. तर बाळुमामांची आकर्षक पुजा बांधण्यात आली होती. संपूर्ण मंदिर व कळस लाईटींगने झळाळून गेला होता. जन्मसोहळयानिमित्त बाळासो पाटील, नानासो द पाटील आदी़ंची प्रवचन व कीर्तन सेवा झाली.सकाळी काकड आरती, अभिषेक, समाधीचे पुजन, आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर दुपारी ४ वा.२३ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा संप्पन्न झाला. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. भाविकांनी बाळूमामांचे पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली.मरगुबाई मंदिरामधूनजन्म समाधीस्थळी अश्वासह भंडारा आणून श्रींचा पालखी सोहळा झाला. मंदिरानजीक आल्यावर श्रींच्या पाळण्याचे पुजन मानकरी राजनंदिनी भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. या जन्मसोहळ्या प्रसंगी सुहासीनी श्रींचा पाळणा ओवाळून पाळणा गीते गायली. तसेच ढोल कैताळांच्या निनादामध्ये भंडा-याची मुक्तहस्ते उधळण झाली. मंदिरासभोवती श्रींचा पालखीसोहळा झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्यावतीने महाप्रसाद झाला. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यावेळी धर्मादाय सह. आयुक्त एस. एस. वाळके, प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नाईकवाडे, रागिणी खडके, भाविक व ग्रामस्थ, कर्मचारी, अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.