गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संशोधन करून 'रुग्ण नियंत्रण यंत्र' बनविले आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील एआयसीटीई, टेक्सा इन्स्टिट्यूट व डीएसटी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या इंडिया इनोव्हेशन चॅलेंज डिझाइन स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे संत गजाननच्या संशोधनाने राष्ट्रीय स्तरावर भरारी मारली आहे. या प्रकल्पाच्या पुढील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील आयआयएम संशोधन संस्थेत संधी दिली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड होणारे या विभागातील 'संत गजानन'चे हे पहिलेच विद्यार्थी ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधन प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबावी व रुग्णावर २४ तास नियंत्रण ठेवण्यासाठी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या पूजा पाटील, पूनम खाडे, रेखा दुंडगे, ज्योती खोत, जुई मुळीक, ज्योती कडूकर या विद्यार्थिनींनी दूरदृष्टी व कल्पकतेतून 'रुग्ण नियंत्रण यंत्र' बनविले आहे.
यंत्रामार्फत रुग्णांचे तापमान, हार्ट बिट्स, आॅक्सिजन पातळी, आर्द्रता मापन केले जाते. रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्याचा प्रसंग आल्यास स्वयंचलित यंत्राद्वारेजवळील रुग्णवाहिकेला संदेश दिला जातो. देशभरातून १८ हजार प्रकल्पांतून या यंत्राची निवड झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आणखी दर्जा उंचावला आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. एस. सावंत, अमर फराकटे, गीता कलखांबकर, प्रदीप चिंधी यांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले.
-----------------------
-
फोटो ओळी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या 'रुग्ण नियंत्रण यंत्रा'ची प्रात्यक्षीक घेताना शिक्षक.
क्रमांक : १५०६२०२१-गड-०१