कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी झालेल्या सूर्यग्रहणामुळे देवीच्या नित्य पूजाक्रमामध्ये बदल करण्यात आला. यामध्ये ९.३0 वाजता होणारी आरती व अभिषेक वगळण्यात आले. या दरम्यान देवीच्या उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक करण्यात आला.गुरुवारी नऊ वर्षांनी आलेल्या सूर्यग्रहणाच्या कालावधीत देवीच्या नित्यपूजाक्रमात बदल करण्यात आला. यात नित्यनियमाप्रमाणे पहाटेची काकडा आरती झाली. त्यानंतर सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांनी सुरू झालेल्या सूर्यग्रहण काळात उत्सवमूर्तीस संततधार जलाभिषेक व धार्मिक विधी करण्यात आला.
ग्रहण समाप्तीचा घाट १० वाजून ५९ मिनिटांनी झाला. त्यानंतर माध्यान्ह पूजेची घाट नेहमीप्रमाणे ११ वाजून ३० मिनिटांनी झाली. या कालावधीत स्थानिक राज्यासह परराज्यातील भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ नेहमीप्रमाणे घेतला. ग्रहणकाळात होणाऱ्या विधींबद्दल श्री करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंदिर व्यवस्थापकांना पत्र दिले होते. त्यानुसार हे विधी पार पडले.