कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला होत असलेली मागणी आणि उत्पादनात मोठी तफावत असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलन करणे गरजेचे आहे. इतर राज्यांतील दूध संघ आमच्या कार्यक्षेत्रात आले असताना आम्ही कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला म्हणून चुकले कोठे? ‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही, असा विश्वास संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला. राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘मल्टिस्टेट’वरून जिल्ह्यात उठलेल्या वादंगावर अध्यक्ष आपटे यांनी पहिल्यांदाच परखड भूमिका मांडली. आपटे म्हणाले, राज्यासह देशात ‘गोकुळ’च्या ब्रॅँडबद्दल विश्वासार्हता आहे. ती दूध उत्पादकांच्या बळावरच आपण कायम राखू शकलो. शेतकऱ्यांची ही मातृसंस्था असून, दर दहा दिवसांनी न चुकता शेतकºयांच्या हातात पैसे पोहोच केले जातात. आता मुंबईच्या बाजारात दूध कमी पडत आहे. त्यासाठी कार्यक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही मल्टिस्टेटचा निर्णय घेतला. संघाचा विस्तार वाढला तर उलाढाल वाढेल, त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांनाच होणार आहे.
उत्पादकच ‘गोकुळ’चा खरा मालक असून, भविष्यातही तोच राहणार आहे. संघाचे २० लाख लिटरपर्यंत विस्तारीकरण केले असून, त्यासाठी दुधाची गरज आहे. त्यात आमच्या कार्यक्षेत्रात बहुराज्यीय संघ व प्रोड्युसर कंपन्या येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करायची झाल्यास आपण सशक्त बनलो पाहिजे. त्यासाठी मल्टिस्टेटची गरज आहे; पण काही विघ्नसंतोषी मंडळी मल्टिस्टेटबाबत जाणूनबूजन दिशाभूल करीत आहेत. मल्टिस्टेट झाल्यानंतर निवडणुका होणार नाहीत, सभासदांचा मतदानाचा हक्क संपुष्टात येईल, खासगीकरण होईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझी दूध उत्पादकांना विनंती आहे, अशा अफवा दूध संघासाठी मारक असून त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मल्टिस्टेटबाबत काही शंका असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही रवींद्र आपटे यांनी केले.
व्यक्ती सभासद करताच येत नाहीतउपविधीतील तरतुदीनुसार दूध व्यवसायातील सहकारी संस्था, बहुउद्देशीय व बहुराज्यीय संस्थाच सभासद करता येतात. व्यक्ती सभासद करता येत नाहीत. आम्ही सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांची मागणीच केलेली नाही. केवळ कर्नाटकातील अथणी, चिक्कोडी, हुक्केरी या तालुक्यांचा समावेश केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संस्था व उत्पादकांच्या हिताला बाधा येणार नाही, असा विश्वास आपटे यांनी व्यक्त केला.मग ‘मंडलिक’, ‘महालक्ष्मी’ मल्टिस्टेट कसे ?’गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्यांचे दूध संघ व साखर कारखाने मल्टिस्टेट कसे? ‘वारणा’, ‘स्वाभिमानी’, ‘हुतात्मा’ आणि बंद पडलेला ‘महालक्ष्मी’ दूध संघ व ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘दत्त’, ‘शाहू’, ‘सदाशिवराव मंडलिक’ हे कारखाने मल्टिस्टेट आहेत.