सतीश नांगरे-लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण : दलित समाजास विचारात न घेता उखळू (ता. शाहूवाडी) येथे सत्ताधाऱ्यांनी विशेष घटक योजनेतून साकवाचे बांधकाम मागणी केलेल्या ठिकाणाऐवजी डोंगराळ भागात केले आहे. ज्या ठिकाणी दलित समाजातील लोकांची कसल्याही प्रकारची वहिवाट नाही. किंबहुना त्या साकवाचा दलित समाजाला काहीच उपयोग नाही. अशा ठिकाणी निधीचा वापर करण्यात आला असून याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन या गावातील दलित समाजाच्यावतीने बांधकाम विभागास देण्यात आले आहे.
समाज कल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून उखळू गावामध्ये साकवाचे बांधकाम सुरू आहे. तांत्रिक मान्यतेनुसार १७ डिसेंबर २०१९ अन्वये ३४.९० लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. हे काम अंदाजपत्रकीय दरापेक्षा ठेकेदाराने ३.५५ टक्के कमी दराने ३०,२०,१९५/- या किमतीस स्वीकारले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र हे काम मागासवर्गीयांच्या कल्याणाकरिता असलेल्या विशेष घटक योजनेतून करण्यात येत असल्याचे समजताच या समाजाने आक्षेप घेतला आहे. गावातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या सोईसाठी व फायद्याकरिताच हे काम दलितवस्तीची वहिवाट नसलेल्या डोंगराळ भागात केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणातील दोषींवर दि. १७ मार्च २०२१ अखेर कारवाई न झाल्यास समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर दलित समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हरीश कांबळे (जिल्हा कौन्सिल्स-भारतीय कम्युनिस्ट पक्ष)
मागासवर्गीय समाजाच्या सोयीसाठी आम्ही ज्या ठिकाणी साकवाची मागणी केली होती. त्या ठिकाणी हे काम न करता सत्ताधाऱ्यांनी मनमानी करत ते काम भलतीकडेच केले आहे. यातून दलित समाजाला गृहीत धरण्याची जातीय मानसिकता दिसून येत आहे. सुरुवातीला हे काम खासदार फंडातून असल्याचे बोलले जात होते. मात्र चौकशीअंती समजले की, हे काम दलित वस्तीसाठी असलेल्या विशेष घटक योजनेतूनच करण्यात आले आहे. त्यामुळे सदरच्या निधीचा गैरवापर झाला असून दोषींवर कारवाई करण्याची आमची रीतसर मागणी आहे.
ए. व्ही. भोसले (उपअभियंता-सा. बां. उपविभाग, शाहूवाडी)
मागासवर्गीय समाजाच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच या साकवाचे काम करण्यात आले आहे. विशेषत: सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे सदरच्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. अन् तरीही मागासवर्गीय समाजाची काही अडचण असल्यास आम्ही ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
-
राजाराम मुटल ( सरपंच-उखळू )
हे काम नेमक्या कोणत्या फंडातून आले आहे, याची आम्हालाही कल्पना नाही. मात्र मंजूर झालेले काम परत जाऊ नये याच हेतूने हे काम करण्यात आले आहे.
फोटो:
उखळू (ता. शाहूवाडी) येथे सुरू असलेले साकवाचे बांधकाम (छाया-सतीश नांगरे)