लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर प्रतिनिधी : ‘पगार शासनाचा काम मात्र खासगी’ अशी अवस्था शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाची असून, प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. शाळेच्या नावाखाली शिक्षक शाळेत जात नाहीत . शिक्षणाचा दर्जा ढासळला असल्याने पालकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
शाहूवाडी तालुका डोंगरकपारीत वसला आहे. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर जिल्हा परिषदेच्या २६८ प्राथमिक शाळा आहेत, तर ७२१ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. सुमारे या जिल्हा परिषद शाळामध्ये १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्पर्धेच्या युगात गरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नाही; मात्र या प्राथमिक शाळेमध्ये ज्ञानार्जन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी शिक्षणाचा बोजवारा उडविला आहे. शासनाचा पगार घेऊन खासगी कामे करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. दहा महिने घरात बसून पगार घेणाऱ्या शिक्षकांना शाळेत गैरहजर राहण्याबद्दल काही वाटले पाहिजे होते. सभापती विजय खोत, प्रभारी गटशिक्षण अधिकारी उदय सरनाईक यांनी केलेल्या पाहणीत शाळेमध्ये शिक्षक रजा न काढता गैरहजर होते. काहीजण शाळा बंद करून गायब होते.
काही शिक्षक विमा कंपनी, खासगी मार्केट साखळी, जमीन खरेदी विक्री, वधूवर सूचक केंद्रे, सामाजिक कामे शाळेच्या वेळेत करीत आहेत. काहीजण तर सायंकाळ झाली की बार समोर हजर असतात. हे शिक्षक वेळेवर शाळेला जात नाहीत. बाजारात फिरत असतात. शासकीय प्राथमिक शिक्षणाचा पूर्णपणे दर्जा ढासळत असल्यामुळे इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत आहेत. शिक्षकांची मुले इंग्रजी शाळेत, गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत अशी परिस्थिती झाली आहे. शिक्षकावर नियंत्रण ठेवणारे केंद्रप्रमुख देखील शिक्षकांना सामील असतात. या सर्व प्रकारांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शिक्षकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
‘केंद्रप्रमुखाची मिलीभगत’
प्राथमिक शिक्षकांवर सहनियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रप्रमुखाची शासनाने नियुक्ती केली आहे. मात्र, शिक्षक व केंद्रप्रमुखाची साखळी असल्यामुळे केंद्रप्रमुख शिक्षकांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गुरुजी बेफान झाले आहेत.
शाहूवाडीमध्ये काम करणारे काही शिक्षक खासगी कंपन्याचे एजंट झाले आहेत. शासनाचा पगार घेऊन खासगी काम करणारे शिक्षक शाळेत जातच नाहीत.