लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रुपये पगार वाढ झाली. संघ व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये याबाबत त्रैवार्षिक करार करण्यात आला. संघाच्या २०४५ कर्मचाऱ्यांना वार्षिक ९ कोटी ६० लाख रुपये पगारवाढीपोटी मिळणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबल्याने सर्वच उद्योग अडचणीत आले. आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी लॉकडाऊनच्या काळात सुयोग्य नियोजन केले. पाच लाख दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत अविरत दूध संकलन, प्रक्रिया व वितरणाचे चांगले नियोजन केले. दूध उत्पादकांना कोरोनाच्या काळात कोणतीही झळ पोहोचू दिली नाही, याचेच फळ म्हणून कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात आली. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, संजय सावंत, संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्ही. डी. पाटील, मल्हार पाटील, आदींमध्ये चर्चा होऊन वाढ देण्याचा निर्णय झाला.
- राजाराम लोंढे