कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडील ४२ कर्मचाऱ्यांना काम न करता २८ महिन्यांचे साडे सहा कोटी रुपयांचे वेतन नियमबाह्य अदा केल्याबद्दल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आंदोलन केले.इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडील ४२ कर्मचाऱ्यांचे समावेशन सार्वजिनक आरोग्य विभागाच्या आदेशाने कायम करण्यात आले. त्यानुसार उपसंचालकरांनी ७ जानेवारी २०२२ रोजी या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे कर्मचारी १० जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्ष कामावर हजर राहिले.
मात्र, या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाचा कोणताही आदेश आणि पदस्थापना नसताना या कर्मचाऱ्यांना १ मे २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कोठेही हजर करुन घेतले नाही आणि त्यांनी कामही केले नाही. तरीही वैद्यकीय अधीक्षक, कार्यालयीन अधिकाऱ्यांनी आर्थिक संगनमत करुन त्यांना नियमबाह्यरित्या वेतन काढून शासनाची साडेसहा कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण कार्यालयाकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल ६ एप्रिल रोजी कार्यालयासमोर उग्र आंदोलन केले होते. तरीही याची दखल न घेतल्याने गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची शासनस्तरावरुन चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेच जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके, राजू जाधव, संजय पाटील, विशाला माेरे, अमर बचाटे, तुषार चिकुर्डेकर, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी केली आहे.