आजरा : आजऱ्याचा सुवासिक घनसाळ तांदळाने ग्राहकांच्या मनावर गेले अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजविले आहे. पण, सध्या आजरा-आंबोली रस्त्याच्या कडेला बसून काही व्यापाऱ्यांकडून घनसाळ म्हणून बोगस तांदळाची विक्री सुरू आहे. घनसाळ तांदळाच्या नावावर कुमूद व सोनामसुरी या नवीन भाताच्या जातीचे तांदूळ ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. असे बोगस घनसाळ तांदूळ विक्री करणाऱ्या व आजरा घनसाळला बदनाम करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
आजरा घनसाळ भाताचे वाण टिकवून ठेवण्याचे काम जि. प. कृषी विभाग, आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ व तालुका कृषी अधिकारी कार्यालय करीत आहे. घनसाळ तांदळाचा सुवासिक व चवदारपणामुळे खवय्यांच्या पसंतीस पडला आहे. आजऱ्याच्या पश्चिम भागातील घनसाळला असणारे पोषक वातावरण, जमिनीची प्रत व पडणारा पाऊस यामुळे सुवासिकपणा वाढत आहे.
आजरा घनसाळ म्हणून रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांनी आजरा घनसाळमध्ये बोगसगिरी सुरू केली आहे. आधुनिक जातीचे कुमूद व सोनामसुरी हे भात घनसाळ म्हणून विक्री केले जात आहे. या तांदळाला अजिबात सुवासिकपणा नाही; पण घनसाळसारखे दिसत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
घनसाळ तांदूळ ६५ ते ७० रुपये किलोने विक्री सुरू आहे, तर कुमूद व सोनामसुरी हे घनसाळसारखे दिसणाऱ्या तांदळाचा दर ३० ते ३५ रुपये किलो आहे. गोवा, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना याबाबत माहिती नसल्याने सर्रासपणे रस्त्याच्या कडेला बसणारे व्यापारी फसवणूक करून आजऱ्याच्या घनसाळला बदनाम करीत आहेत. अशा व्यापाऱ्यांवर कृषी विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.
-------------------------------
* घनसाळ तांदळाची पावती मागा
घनसाळ तांदूळ म्हणून व्यापाऱ्यांची खाबुगिरी सुरू आहे. पर्यटक व घनसाळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी व्यापाऱ्यांकडून पावती घ्यावी. त्यावर तांदूळ विक्रीचा रजिस्टर व जी. एस. टी. नंबर आहे का ते पाहावे. पावतीशिवाय घनसाळ तांदूळ खरेदी करू नये, असे आवाहन आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी केले आहे.