लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : अवघ्या महाराष्ट्राची शान असलेला आणि ३५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला ‘किल्ले सिंधुदुर्ग’ विकण्याचे फलक शहरात चार ठिकाणी लावण्यात आल्याने शिवप्रेमींत एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी ‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचे फलक शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लावल्याने सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमी व किल्लेप्रेमींतून संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रकाराची माहिती शिवप्रेमींनी पोलिसांना देताच पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने हे फलक तातडीने हटविले. दरम्यान, ‘किल्ले सिंधुदुर्ग’बाबत रविवारी रात्री वादग्रस्त फलक लावणाऱ्या तीन युवकांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानुसार मालवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत काही तासाच्या आताच तिघापैकी दोघाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी सायंकाळी या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई करण्यात येत होती. ऐतिहासिक वारसा स्थळाचा प्रत्येकाला आदर व सन्मान असतो. मात्र, असे समाजविघातक कृत्य करणाऱ्यांचा मालवण जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. मालवण शहरात वायरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत किल्ले सिंधुदुर्ग गेली ३५० वर्षे अजस्त्र लाटांशी एकाकी झुंज देत गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. याच महिन्यात या किल्ल्याच्या ३५० व्या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता होणार आहे. असे असताना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी कोणत्याही किल्ल्याच्या नावाचा उल्लेख न करता केवळ ‘किल्ला विकणे आहे, संपर्क : उसनी प्रेरणा समिती व संबंधित’ अशा आशयाचा मजकूर व किल्ल्याचे पुसटसे छायाचित्र असलेला फलक (फ्लेक्स) लावला.किल्ल्यांची अवहेलनाफलकावरील मजकुरात मोजकेच शब्द असले तरी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्या फलकावर किल्ले सिंधुदुर्गचे अस्पष्ट छायाचित्र असल्याचे दिसते. ३५० वर्षांच्या इतिहासात कोणत्याही समाजकंटकाने किल्ल्याच्या अस्मितेला तडा जाईल, असे कृत्य केले नव्हते. मात्र, जाणीवपूर्वक कृत्यामुळे किल्ल्यांची अवहेलना झाल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमींतून उमटत आहेत.बदनामी करणाऱ्या अपप्रवृत्तींचा निषेधकिल्ल्याची बदनामी करणाऱ्या मजकुराने एकच खळबळ उडाली असून, शिवप्रेमींत नाराजी पसरली आहे. ऐतिहासिक किल्ल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येत होता. किल्ले प्रेरणोत्सव समिती व वायरी ग्रामपंचायत तसेच सामाजिक संस्था, शिवप्रेमींनी या अप्प्रवृत्तीचा निषेध केला आहे.शिवप्रेमींचा उद्रेक शक्यकिल्ले सिंधुदुर्गवर ३५० वा वर्धापनदिन सांगता सोहळा होणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींत जल्लोषाचे वातावरण आहे. अज्ञातांच्या या कृत्यामुळे लाखो किल्लाप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याआहेत.तिघा युवकांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद 1‘किल्ले सिंधुदुर्ग’बाबत रविवारी रात्री वादग्रस्त फलक लावणाऱ्या तीन युवकांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानुसार मालवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत काही तासांच्या आताच तिघांपैकी दोघाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी सायंकाळी या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. 2रविवारी मध्यरात्री बाजारपेठ मार्गे तीन युवक दोन दुचाकी घेऊ न बंदर जेटी येथे दाखल झाले. तिघांनी परिसराची पाहणी करून बंदर विभागाच्या लोखंडी कुंणाला फलक लावून पोबारा केला. हा प्रकार बंदरजेटी येथील सीसीटीव्हीत कैद झाला. सोमवारी सकाळी चार फलक लावल्याचे आढळताच खळबळ उडाली होती. किल्ले प्रेरणोत्सव समितीने समाजकंटकांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी विशेष पथक नेमून दिवसभर अज्ञातांच्या मागावर होते. सायंकाळी उशिरा सीसीटीव्हीत कैद झालेला चेहरा व दुचाकीचा माग लागताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.तिन्ही युवक स्थानिकया प्रकरणातील तीनही युवक स्थानिक असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरु केली आहे. रात्री उशिरा अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, या युवकांनी फलक का लावले ? कशासाठी ? तसेच यामागील सूत्रधार कोण आहे ? याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी दोन दुचाकींपैकी एक दुचाकी ताब्यात घेतली आहे.
मालवणात ‘किल्ला विकणे’ने खळबळ
By admin | Published: May 09, 2017 12:09 AM