कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीत कर न भरता व परवाना न घेता बेकायदेशीररीत्या तांदळाची विक्री करणाऱ्या कर्नाटकातील पाचजणांना टेम्पो (के. ए.-२२-ए-२३८४)सह शनिवारी दुपारी समितीच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. यावेळी सुमारे ४० हजार रुपये किमतीची तांदळाची ४८ पोती जप्त करण्यात आली. कमी दराने बासमतीच्या नावाखाली त्यांच्याकडून शेला तांदळाची विक्री सुरू होती. पुढील कारवाईसाठी हा तांदूळ व विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. कर्नाटकातील भैरू लक्ष्मण बजंत्री, सुरेश मारुती बजंत्री, भरमा मारुती बजंत्री यांच्यासह दोन महिला (रा. कंग्राळी व होनगा, जि. बेळगाव) टेम्पोतून तांदळाची ६७ पोती घेऊन शहरात विक्रीसाठी आले होते. शाहूपुरीतील बी. टी. कॉलेज व शहाजी लॉ कॉलेज चौकात हा टेम्पो थांबवून विक्री सुरू होती. शाही भोग अमृतसरी नं.१ (बासमती राईस)च्या पॅकिंगमधील हा तांदूळ होता. बाजारभावाप्रमाणे या तांदळाच्या पोत्याचा दर सुमारे २५०० रुपये आहे. या ठिकाणी या तांदळाचे पोते एक हजार रुपये दराने विकले जात होते. जवळपास निम्म्याहून कमी किमतीत तांदूळ मिळतोय म्हटल्यावर खरेदीसाठी ग्राहकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. काही वेळातच १९ पोत्यांची विक्री झाली. बेकायदेशीररीत्या बासमतीच्या नावाखाली शेला तांदळाची विक्री सुरू असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संजय हुकिरे यांनी बाजार समितीकडे केली. त्यानंतर काही वेळातच बाजार समितीचे सभापती परशुराम खुडे, उपसभापती विलास साठे, संचालक सदानंद कोरगावकर यांच्यासह सचिव विजय नायकल, सहसचिव मोहन सालपे, निरीक्षक दिलीप राऊत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र तळस्कर यांच्या भरारी पथकाने या ठिकाणी येऊन हा तांदूळ जप्त केला व तांदळासह टेम्पो बाजार समितीच्या कार्यालयात आणण्यात आला. यानंतर बाजार समितीकडून अन्न औषध प्रशासन विभागाला या कारवाईबाबत कळविले. काही वेळातच अन्न औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र पाटील या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी समितीने जप्त केलेला माल ताब्यात घेऊन संबंधितांचे जबाब घेतले.
बेकायदेशीर तांदूळ विक्री; टेम्पो ताब्यात
By admin | Published: February 07, 2016 12:54 AM