कोल्हापूर : पोस्ट कार्यालयामार्फत देण्यात येत असलेल्या अस्सल देवगड हापूसला कोल्हापुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातून ४५० पेट्या आंब्याची विक्री पोस्ट कार्यालयाने केली आहे. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून ही योजना आणखी महिनाभर सुरुच ठेवण्यात येणार आहे, असे पोस्ट कार्यालयाने सांगितले. चांगल्या प्रतीचा एक नंबरचा हा आंबा ७०० रुपये प्रति डझन या दराने विक्री करण्यात आला.कोल्हापुरात पोस्टामार्फत ही योजना सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, देवबाग, मालवण या परिसरातील हा आंबा दर्जेदार मानला जातो. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला जीआय मानांकन प्राप्त अस्सल देवगडचा हा आंबा थेट बागायतदारांकडून घेउन तो ग्राहकांना देण्यात येतो आहे. येत्या दोन दिवसांत अक्षय तृतियेसाठी बुकिंग सुरु होणार असून याचा नवा दरही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या आंब्याची बाजारात १३०० रुपये डझन असा दर आहे.गुढी पाडव्याला पोस्ट कार्यालयामार्फत कोल्हापूर शहरासाठी ९०० रुपये दराने १०० पेटी आंब्याचे बुकिंग झाले होते. त्यानंतरही आणखी ५० पेटी आंब्याची मागणी वाढली होती. त्यानंतरही २०० रुपये कमी म्हणजे ७०० रुपये दराने २०० पेटी आंब्याचे बुकिंग करुन हे आंबे कोल्हापूरकरांनी संबंधित पोस्ट कार्यालयातून घरी घेउन गेले. पोस्ट खात्याने आतापर्यंत ३५० आंबा पेट्यांची रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यावर क्रेडिट केली आहेत. निश्चित कालावधीत आंबा पेट्या पोस्ट कार्यालयातून मिळाल्यामुळे कोल्हापुरकरांना वेळेत आंबा चाखायला मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अक्षय तृतियेसाठी लवकरच बुकिंग
येत्या दोन दिवसात पुन्हा अक्षय तृतियेसाठी आणखी कमी दराने बुकिंग घेण्यात येणार आहे. सध्या कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर आणि इचलकरंजी येथील पोस्ट ऑफिसमध्ये आंब्याचे बुकिंग करण्यात येणार आहे.
आतापर्यंत देण्यात आलेले आंबे उत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया पोस्टाकडे आल्या आहेत. उच्च प्रतीच्या आणि मोठ्या आकाराच्या या आंब्याबाबत एकही तक्रार पोस्ट कार्यालयाकडे आालेली नाही. उलट मागणी वाढली आहे. त्यामुळे अक्षय तृतियेसाठीही बुकिंग सुरु करत आहोत, याशिवाय आणखी नवीन योजना लवकरच जाहीर करण्यात येेतील. -अर्जून इंगळे, प्रवर अधिक्षक, कोल्हापूर डाकघर.