कोल्हापूर : संचारबंदी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवशी गोकुळ दुधाच्या संकलनावर काही परिणाम झाला नाही, पण विक्रीवर मात्र झाला. मुंबईत सव्वा लाख लिटरने तर कोल्हापुरात २५ हजार लिटरने दुधाची मागणी घटली. विक्री घटल्याचा फटका संघाला बसला आहे.
महिनाअखेरपर्यंत होणाऱ्या कडक संचारबंदीची सुरुवात गुरुवारपासून झाली. कोल्हापुरात संकलन होणाऱ्या रोजच्या साडेबारा लाख लिटर दुधापैकी आठ लाख दूध एकट्या मुंबईत विक्री होते. गुरुवारी यातील सव्वा लाख लिटर दुधाची विक्री होऊ शकली नाही. कोल्हापूर शहरात रोजची ७० हजार लिटरची मागणी असते, पण संचारबंदीमुळे चहा टपऱ्या, किरकोळ विक्रेते, हॉटेल बऱ्यापैकी बंद राहिल्याने त्यांच्याकडून मागणी कमी झाली. परिणामी यातील ४५ हजार दुधाची विक्री होऊ शकली. विक्री घटली असली तर दुधाचे संकलन मात्र नेहमीप्रमाणे सुरूच आहे. संचारबंदीच्या नियमातून संकलन करणाऱ्या वाहनांना मुभा दिली असल्याने उत्पादकांना कोणत्याही प्रकारची झळ बसली नाही. नियमितपणे त्यांचे संकलन व वितरण सुरू राहिले.