कोल्हापूर : विक्रीकर निरीक्षकपदाच्या (एसटीआय) मुख्य परीक्षेत कोल्हापूरच्या प्राची सखाराम भिसे यांनी १३५ गुणांसह महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएसी) सन २०१६ घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी आॅनलाईन जाहीर झाला.‘एमपीएससी’तर्फे विक्रीकर निरीक्षक संवर्गातील एकूण १८१ पदांसाठी दि. ३ जून २०१७ रोजी ‘विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा २०१६’ घेण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील एसएससी बोर्ड परिसरात राहणाºया प्राची भिवसे यांनी या परीक्षेत त्यांनी महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला.
यापूर्वी त्यांनी ‘एसटीआय’ ची मुख्य परीक्षा दि. २६ नोव्हेंबर २०१६ दिली. त्याचा निकाल दि. ८ मार्च २०१७ ला जाहीर झाला. यात त्यांची एक गुण कमी पडल्याने निवड यादीतील त्यांचे स्थान हुकले.
यानंतर मात्र, प्रतिक्षा यादीतून त्यांची ‘एमपीएससी’कडून निवड झाली. यातील कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान, जून २०१७ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात त्यांनी राज्यात प्रथम येत बाजी मारली. या यशाबद्दल त्यांच्यावर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरुन शुभेच्छांचा वर्षाव केला. प्राची यांचे वडील निवृत्त बँक कर्मचारी, तर आई सुनिता या गृहिणी आहेत.