आजरा :
डिसेंबरमध्ये हिरण्यकेशी नदीवरील साळगावजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक पिलर कोसळला होता. त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाने यासाठी १६ लाख रुपयांची तरतूद केली असून पिलरसह बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाणार आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या साळगाव बंधाऱ्यावरून सध्या साळगाव, पेरणोली, देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, विनायकवाडी यासह गारगोटीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात १५ ते २० दिवस बंधाऱ्यावर पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यातील अनेक दिवस नागरिकांना सोहाळे मार्गे प्रवास करावा लागतो. डिसेंबरमध्ये बंधाऱ्याच्या आजऱ्याकडील बाजूचा चार नंबरचा पिलर कोसळला आहे. तातडीने दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाने यासाठी १६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. बंधाºयाच्या पिलर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपूर्वी बंधाऱ्याच्या पिलरचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर बांधकाम विभागाचा अहवाल घेऊन बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे. सद्य:स्थितीत साळगाव बंधाऱ्यात असणारे पाणी नदीपात्रातून अन्य बाजूने वळविले आहे. साळगाव बंधारा हिरण्यकेशी नदीवरील असून ५३ वर्षांपूर्वी तो बांधला आहे. या बंधाऱ्यावरून वाहतूक करण्यासाठी परवानगी वाहतूक करण्यास परवानगी नसतानाही सध्या तो वाहतुकीसाठी जवळचा मार्ग झाला आहे. बंधाऱ्याची आयुष्य मर्यादा संपली आहे.
---------------------
बंधाऱ्याला पर्यायी पूल होणार कधी?
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साळगाव बंधाऱ्यावर पाणी येते. पाणी आल्यानंतर पर्यायी पुलाची चर्चा सुरू होते व थांबते. आता पिलरच कोसळला असल्याने तातडीने पर्यायी पूल होणे गरजेचे आहे. आ. प्रकाश आबीटकर यांनी पर्यायी पुलाला निधी मंजूर करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---------------------------
* फोटो ओळी : हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्याच्या पिलरचे सुरू असलेले काम.
क्रमांक : ०८०४२०२१-गड-०८