कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड आणि गगनबावडा तालुक्यातील गगनगड हे दोन्ही किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतच्या प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाकडे पाठवला आहे. ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी शासन आदेश निघाले.सामानगड किल्ला राजा भोज दुसरा यांनी १२ व्या शतकात बांधला. सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. विविध लढायांसाठी आवश्यक साधनसामग्री ठेवण्यासाठी प्रामुख्याने या किल्ल्याचा वापर होत होता. त्यामुळे सामानगड असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट या किल्ल्यावर झाल्याचे सांगण्यात येेते. हा किल्ला संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्र १२.९६ हेक्टर आर इतके आहे.शिलाहार राजा भोज दुसरा यांनी इ.स. ११७५ ते १२०९ पर्यंत गगनगडावर राज्य केले. पन्हाळा ही त्यांची राजधानी होती. कोल्हापूर परिसरात एकूण १५ किल्ले त्यांनी बांधले. सिंधन यादव यांनी सन १२०९ मध्ये राजा भोज यांचा पराभव करून गगनगड किल्ला ताब्यात घेतला. सन १३१० मध्ये देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर हा किल्ला दिल्लीच्या, त्यानंतर बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६५८ मध्ये गगनगड जिंकून घेतला. हा किल्ला संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्र ४.०१ हेक्टर आर इतके आहे.
सामानगड संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा
- पूर्व : मौजे खमलेहट्टीची शीव
- पश्चिम : मौजे चिंचेवाडीची शीव
- उत्तर : मौजे खमलेहट्टीची शीव
- दक्षिण : मौजे नौकुडची शीव
गगनगड संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा
- पूर्व : मौजे करूळची शीव
- पश्चिम : मौजे भुई बावडेची शीव
- उत्तर : गट क्र. ७५
- दक्षिण : मौजे करूळची शीव
या समावेशामुळे काय होते?हे किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यानंतर या ठिकाणच्या वास्तू, परिसर संवर्धन करण्यासाठी पूरक स्थिती निर्माण होते. तसेच यामध्ये आधुनिक पद्धतीप्रमाणे बदल करता येत नाही. थोडक्यात, या परिसराला शासकीय संरक्षण लाभते.