लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकवीस वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाण्याकडे शेतकऱ्यांसह आया-बहिणींचे डोळे लागले आहेत. उत्तूर, कडगाव परिसरातील हजारो एकर जमीन पाण्यासाठी आसुसलेली आहे. मात्र, समरजीत घाटगे राजकारणाच्या नादात चुकीचे वक्तव्य करीत आहेत. त्यांनी आपले अज्ञान प्रकट करू नये, असे टीकास्त्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर यांनी पत्रकातून सोडले.
आजूबाजूचे हिरवेगार शिवार झाले असताना आमची शेती पाण्यावाचून उजाड आणि भकास आहे. आमची माणसे मोलमजुरीसाठी पुणे, मुंबई आणि गोव्याकडे गेली आहेत. आता आंबेओहोळ प्रकल्प दृष्टीक्षेपात आल्यानंतर आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पाचे श्रेय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मिळणार म्हटल्यावर समरजीत घाटगे राजकीय द्वेषापोटी टीका करीत आहेत. विकास कामात अडथळा निर्माण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालवू नये. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी शब्द दिला आहे. मात्र, या प्रकल्पाचे सुधारित मान्यतेचे २२७ कोटी गेले कोठे? असा प्रश्न अज्ञानातून घाटगे यांनी विचारला. त्यांनी जलसंपदा विभागाकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज असल्याचे सतीश पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
अशी आहे प्रकल्पाची वाटचाल...
प्रकल्पास १९९८ मध्ये २९ कोटी ३१ लाख निधीसह प्रशासकीय मान्यता मिळाली. भूसंपादन व पुनर्वसनाची तरतूद म्हणून ५ कोटी ३० लाख रुपये व प्रकल्पासाठी २४ कोटी ४१ लाख रुपये होते. लाभ क्षेत्रातील चार एकरांवरील क्षेत्राची अट मान्य नसल्याने पुनर्वसनासाठी जमिनी मिळण्यात अडचणी होत्या. मंत्री हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना हेक्टरी ३६ लाख रुपयांचे पॅकेज जमिनींच्या मोबदल्यापोटी देण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे नियामक मंडळाकडे पाठविला. मात्र, राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प झाले. दुसरी प्रशासकीय मान्यता २२७ कोटी ५४ लाख रुपये, त्यातील १७४ कोटी ३० लाख प्रकल्पावरील खर्च व ९८ कोटी ६० लाख पुनर्वसन पॅकेज, जमिनीसाठी तरतूद होती. त्यातील ५४ कोटी शिल्लक असल्याचे सतीश पाटील यांनी म्हटले आहे.