कोल्हापूर : राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना ताराराणी चौकात अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. बरोबर याच फलकाच्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांचेही मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. समरजित यांनी अपक्ष रिंगणात उतरून २०१९ साली मुश्रीफ यांच्या नाकात दम आणला होता. यानंतर त्यांनी पायाला भिंगरी लावून मुश्रीफांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा सपाटा लावला होता. अशातच अजित पवार युतीसोबत येवून मुश्रीफ कॅबिनेट मंत्री झाल्याने घाटगे यांना मोठा धक्का बसला. परंतू समरजित यांनी गुरूवारी कागलमध्ये मेळावा घेत येणाऱ्या विधानसभेला मोठ्या फरकाने निवडून येवून आमदार होणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना पुन्हा बळ दिले. याही पुढे जात आता मुश्रीफ यांच्या अभिनंदनाच्या फलकावर घाटगे यांचा फलक आणि त्यावर लिहलेला ‘निष्ठा’ हा शब्द मुश्रीफ यांची कळ काढणारा आहे. या फलकांची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे.जिल्हा बँकेच्या अभिनंदन फलकाची चर्चायाच ठिकाणी जिल्हा बँकेच्या संचालकांच्यावतीने मुश्रीफ यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक लावण्यात आला आहे. परंतु त्यात काँग्रेस संचालकांची नावे दिसत नाहीत. तसेच मुश्रीफांच्या आघाडी विरोधात निवडून आलेले बाबासाहेब पाटील असूर्लेकर यांचाही फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. मानसिंग गायकवाड यांचा कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय झाला नसला तरी त्यांच्या मुलाचा फोटो मुश्रीफ यांच्या अभिनंदन फलकावर आहे.
Kolhapur- मंत्री मुश्रीफांच्या पोस्टरवर समरजित घाटगेंचे होर्डिंग, राजकीय वैर कायम; घाटगेंच्या होर्डिंगचीच चर्चा
By समीर देशपांडे | Published: July 07, 2023 1:28 PM