साके : मुश्रीफसाहेब म्हणाले होते की २०१३ साली हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. हे जर खरे असेल तर मग अकरा वर्षे भूमिपूजनला का लागली अशी रोखठोक विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी मंगळवारी केली. बाचणी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री पाटील होत्या.घाटगे म्हणाले, २०१३ मध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली. त्यावेळी माझा राजकीय जन्म झाला नव्हता हे खरे आहे, पण तुम्हीच तर सत्तेत आहात. मग गेली अकरा वर्षे या आरोग्य केंद्राचे काम का रखडले? या परिसराला आरोग्य सेवांपासून आपण का वंचित ठेवले? बाचणीसह परिसराच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले हे आरोग्य केंद्र होऊ नये म्हणून तुम्ही खटाटोप केले. श्रेयवादासाठी भूमिपूजन करता यासारखे मोठे दुर्दैव नाही. ज्या शरद पवारांनी तुम्हाला मोठे केले, त्यांच्यावर तुम्ही जातीयवादाचा आरोप करता हे वेदनादायी आहे.कार्यक्रमास ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, प्रताप पाटील, डी. एस. पाटील, रंगराव जाधव, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्या आनंदी पाटील, अन्सार नायकवडी, सायर घोन्सालिस, सुमन पाटील, नफिसा शहाणेदिवाण, मेघा चौगले, ग्रामविकास अधिकारी सागर पार्टे, आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांना हे तर अशोभनीय..स्वत: पालकमंत्री असतानाही एका रात्रीत घाईगडबडीत पोलिस बंदोबस्तात भूमिपूजनचा देखावा का केला. चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या मंत्र्यांना हे अशोभनीय आहे, असे घाटगे म्हणाले.