कोल्हापूर : कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या कर्तृत्ववान चेहऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितच वाढणार असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत काढले. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांचे दुसरे वारसदार पक्षात आल्याने ‘भाजप’ला बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. समरजितसिंह घाटगे यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. घाटगे यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री सुहासनीदेवी घाटगे, चुलते प्रवीणसिंहराजे घाटगे, पत्नी नवोदिता घाटगे, भाऊ वीरेंद्रसिंहराजे घाटगे, डॉ. स्वप्निल भोसले उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके हेही उपस्थित होते. घाटगे यांचे स्वागत करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सहकार क्षेत्रात ‘शाहू’ ग्रुपचा दबदबा असून, यापूर्वीच दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांना पक्षात येण्यासाठी प्रयत्न केले; पण ते आले नाहीत. त्यांचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर समरजितसिंह यांच्या रूपाने शाहू महाराजांचे वारसदार पक्षात आल्याने पक्षाला निश्चितच बळ मिळाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्याच पद्धतीने राज्यात काम सुरू आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना भाजपमध्ये नेहमीच महत्त्वाचे स्थान राहील.’ (प्रतिनिधी) म्हाडाचे अध्यक्षपद देणार : दानवे समरजित घाटगे हे राजघराण्यातील आहेत. उच्चशिक्षित अशा या तरुण नेतृत्वाचा सन्मान करून त्यांना म्हाडाचे पुणे विभागीय अध्यक्षपद दिले जाईल. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्र परिषदेत सांगितले. घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात बळ मिळेल, असेही दानवे म्हणाले. आईसाहेब, काळजी नको ‘आईसाहेब, काळजी करू नका. समरजितसिहांची काळजी आम्ही घेतो. आतापर्यंत त्यांना राजकीय व्यासपीठ मिळाले नव्हते. भाजप त्यांच्यामागे संपूर्ण ताकद लावेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुहासनीदेवी घाटगे यांना दिला. भाजपच्यावतीने उद्या स्वागत! उद्या, सोमवारी सकाळी साडेदहा वाजता येथील हॉटेल अयोध्या येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून, यामध्ये समरजितसिंह घाटगे यांच्यासह पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने जो विश्वास टाकला, त्याला पात्र राहूनच काम करणार असून, कागल व मुरगूड नगरपालिका निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविणार आहे. - समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष, शाहू साखर कारखाना)
समरजितराजे घाटगेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
By admin | Published: October 23, 2016 1:05 AM