NCP Jayant Patil ( Marathi News ) : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांच्या कार्यकर्तांचा मेळावा आज पार पडला असून या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील या मेळाव्याला उपस्थित होते. समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी शरद पवार स्वत: कागलमध्ये येणार असून ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता गैबी चौकात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी समरजीतसिंह घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित केला होता. या मेळाव्याला जयंत पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी आपल्या भाषणातून जयंत पाटील यांनी घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाबाबत जाहीर विचारणा केली आणि कार्यकर्त्यांकडून सहमती येताच या सोहळ्याची तारखी जाहीर करून टाकली. "मागील १० वर्षांत प्रतिकूल परिस्थिती असताना, सत्ता नसताना तुम्ही समरजीतसिंह घाटगे यांचं नेतृत्व उभा केलं आहे. संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांचं आहे, असं ते सांगत असतात. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी आज इथं आलो आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समरजीतसिंह घाटगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर उभं करण्यास तुमची परवानगी आहे का?" असा प्रश्न जयंत पाटील यांनी समरजीतसिंह घाटगेंच्या कार्यकर्त्यांना विचारला. त्यानंतर घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत सहमती दर्शवली.
"महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे आता लगेच तिकिटे जाहीर करायची नाहीत, असं ठरलं असल्यामुळे त्याबाबतीत जे काही आहे ते पुढील सभेत जाहीर करू. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाने भाजपची साथ सोडली आणि शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचं ठरवलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. मी आत्ताच पवारसाहेबांशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं आहे की, मी स्वत: समरजीतसिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी कागलला येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही ३ तारखेच्या तयारीला लागा. उमेदवारीबाबत जे काय बोलायचंय ते त्यावेळी बोलू," असं म्हणत पाटील यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्या कागलमधील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "गैबी चौकात ही सभा होईल. आता तुम्ही सगळ्यांना या सभेच्या तयारीला लागा. समरजीतसिंह घाटगेंच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं राज्यभरातीलच चित्र बदलणार आहे. कारण आम्ही लोकसभेला बघितलं की, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपतींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार वाचवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेनं साथ दिली. तुम्ही सगळ्यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्या पाठीशी आगामी निवडणुकीत आशीर्वाद उभे करा, शरद पवारसाहेबांचे आशीर्वाद आणि ताकद त्यांच्यासोबत असणार आहे," असा शब्दही यावेळी पाटील यांनी दिला आहे.