साळवण: तिसंगी, ता. गगनबावडा येथे सांबराची शिकार केल्याप्रकरणी काल, रविवारी रात्री उशीरा तिघांना गगनबावडा वनविभागाने रंगेहाथ पकडले. सुभाष बापू पाटील (वय ४२), जालिंदर कृष्णात पाटील (३०), विठ्ठल कोंडीबा पाटील (३८, सर्व रा. निवडे, ता. गगनबावडा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तिसंगी येथील 'मीटर माळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगल परिसरात मादी जातीच्या गर्भवती असलेल्या 'सांबराची बंदुकीच्या साह्याने शिकार केल्यानंतर मृत सांबराचा शिरच्छेद करताना तिघा संशयितांना गगनबावडा वनविभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. यावेळी दोघे बंदूक व शस्त्रासह पसार झाले होते. यातील पांडुरंग बाबू पाटील (४२) हा वनविभाग साळवण दुरक्षेत्र येथे स्वतः हजर झाला असून संशयित संजय लहू पाटील हा बंदुकीसह फरार आहे. वन विभागाने वन्यजीव कायद्याप्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा तपास सुरू आहे. चौघा संशयित आरोपींना आज, सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रियांका भवार, वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, ओमकार भोसले, प्रकाश खाडे, वनसेवक धोंडीराम नाकाडे, मुबारक नाकाडे, दादू पाटील, नाथा कांबळे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रियांका भवार करत आहेत.सांबर गर्भवती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता मादी जातीची 'सांबर' गर्भवती असल्याचे लक्षात आले. येत्या आठ दिवसांमध्ये ती आपल्या बाळाला जन्म देणार होती. समोर घडलेला प्रकार बघून वन विभागातील कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.
Kolhapur: तिसंगीत सांबराची शिकार, चौघे ताब्यात; एकजण पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:34 AM