हडपसर/कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या विषयी असभ्य, अपशब्द वापरून मराठा समाजाच्या भावना भडकवणारी विधानं करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेडने हडपसर पोलीस ठाण्यात दिला आहे.छत्रपती संभाजी राजे यांच्यासह मराठा समाजासाठी लढणाऱ्या मराठा नेत्यांना अफजल खानाची उपमा देऊन त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.याविषयी सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा लाईव्ह कार्यक्रम एका वाहिनीवर सुरु होता, या कार्यक्रमात चर्चेदरम्यान सदावर्ते यांनी छत्रपती संभाजी राजे आणि मराठा नेते यांच्या विषयी असभ्य आणि अपशब्द वापरून बदनामी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
सदावर्ते याचा उद्देश महाराष्ट्रामधील कायदा व सुव्यवस्था बिघडुन जातीय दंगली निर्माण करण्याचा आहे. भारतीय संविधानाच्या आडून भावना भडकीवण्याचा खेळ ते खेळत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील, मारुती काळे, सुनील हरपळे आदींनी केली आहे.